मुंबई । अजेयकुमार जाधव 26 Oct 2017 -
मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सैरभर झालेल्या मनसे काय करावे आणि काय करू नये याचे भान राहिले नसल्याचे उघड झाले आहे. मात्र मनसे सैरभर झाली असताना त्यांचा चांगलाच समाचार मुंबईच्या महापौरांनी घेतला आहे. मनसेचा समाचार घेताना मनसेला पुर्णपणे वेड्यात काढले आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या विरोधात मनसेने कोंकण आयुक्तांकड़े तक्रार केली आहे. या नगरसेवकांचे पद रद्द करताना त्यांना पालिकेत प्रवेश देऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच महापालिकेचे सभागृह गुरुवारी असताना एक दिवस आधी या सहाही फुटीर नागरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. या व्हीप नुसार या नगरसेवकानी पक्षाचा आदेश धुडकावून कोणालाही मतदान करू नये असे या नागरसेवकांना निर्देश देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर यांच्याशी संपर्क साधला असता, ते सहाही नगरसेवक महानगरपालिकेचे सदस्य आहेत. त्यांना सभागृहात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांनी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्येने पक्ष सोडला आहे. ते सहाही नगरसेवक स्वच्छेने शिवसेनेत आले आहेत. त्यामणुळे काहीही झाले तरी ते पुन्हा मनसेत जाणार नाहीत असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.
मनसेच्या या सहा फुटीर नागरसेवकांना मनसेच्या चिटणीसांच्या सहीने व्हीप बजावण्यात आला आहे. या व्हीप बाबत बोलताना नगरसेवकांना व्हीप बजावण्याचा अधिकार गटनेत्यांना असतो. यांचा गटच शिल्लक राहिलेला नाही, मग कोणत्या गटनेत्याने हा व्हीप काढला हे बघायची गरज आहे, असे म्हणत मनसेची खिल्ली उडवली आहे. या नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. हे सहाही नगरसेवक आता शिवसेनेचे असल्याने शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.