मुंबई । प्रतिनिधी 30 Oct 2017-
मुंबईचे एक महत्वाचे पर्यटन स्थळ व महत्वाचे आकर्षण म्हणजे जुहू चौपाटी, जगभरातून येणार पर्यटक आणि हजारो मुंबईकर देखील मुला-बाळांसह काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे म्हणून या जुहू चौपाटीवर येत असतात. या जुहू चौपाटीवरील सुशोभिकरण विद्युत रोषणाई प्रकल्पाचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांच्या हस्ते सोमवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळी 7.30 वाजता जुहू तारा रोड, जुहू चौपाटी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांस विशेष उपस्थिती म्हणून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम तर विशेष उपस्थिती म्हणून खासदार गजानन किर्तीकर, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेरकर, आमदार भाई जगताप, उपमहापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रेणु भसीन, सुधा सिंग, नगरसेवक अनिष मकवानी, रोहन राठोड असणार आहेत. या प्रस्तावित सुशोभिकरणांतर्गत जुहू चौपाटीवरती १२ मीटर उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण असे १०० खांब बसविण्यात आले आहेत. या प्रत्येक खांबावर `टेन्साईल फॅब्रिक' पासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेची प्रारुपे बसविण्यात आले आहे. या शिडाच्या नौकेच्या खालच्या बाजूने 4 दिवे असणार आहेत. तर समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर व चौपाटीच्या वाळूवर प्रकाशाच्या सहाय्याने सामाजिक संदेश देता यावेत, यासाठी या खांबावरती 'गोबो प्रोजेक्टर्स' देखील असणार आहेत. या सर्व बाबींमुळे जुहू चौपाटीचे रुपडे खुलण्यासोबतच जुहू चौपाटीवरची संध्याकाळ अधिक रमणीय व मनमोहक होणार आहे. या कार्यक्रमांस उपस्थित राहाण्याचे आवाहन उपायुक्त (परिमंडळ-4) किरण आचरेकर व उपायुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर यांनी केले आहे.