उपहारगृहातील स्वयंपाकघरांसाठी 150 चौरस फूटांची अट रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2017

उपहारगृहातील स्वयंपाकघरांसाठी 150 चौरस फूटांची अट रद्द


मुंबई । प्रतिनिधी 22 Oct 2017 - 
मुंबईत व्यवसाय सुरु करणे व व्यवसाय चालविणे या विषयीच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा व प्रक्रियांचे सुलभीकरण करत आहे. याचाच एक भाग म्हणून उपहारगृहांमधील स्वयंपाक घरांसाठी असणारी किमान 150 चौरस फूटांची अट शिथिल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र उपहारगृहांसाठी आवश्यक असणारे मुंबई अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असणार आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. 

मुंबईत उपहारगृह चालू करावयाचे झाल्यास त्यासाठी किमान 300 चौरस फुटाची जागा असणे बंधनकारक आहे. या जागेपैकी किमान 150 चौरस फुट एवढी जागा स्वयंपाकघरासाठी वापरणे महापालिकेच्या नियमाप्रमाणे बंधनकारक होते. मात्र मुंबईत अनेक प्रकारची उपाहारगृहे उभी राहिली आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या आकाराची स्वयंपाकघराची आवश्यकता भासते. यामुळे महापालिकेच्या नियमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसत नसल्याने महापालिकेने उपहारगृहातील स्वयंपाकघरांसाठी असणारी 150 चौरस फूटांची अट रद्द केली आहे. स्वयंपाकघरांसाठी असलेली अट रद्द केली असली तरी उपहारगृहांच्या उंचीबाबत असणारी किमान 9 फूटांची अट पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. पालिकेने केलेल्या या सुधारणेमुळे उपहारगृहांमध्ये ग्राहकांना अधिक जागा उपलब्ध होणार असल्याचे केसकर यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad