मुंबईतील हायमास्ट दिवे बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2017

मुंबईतील हायमास्ट दिवे बंद


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईत वाहतुकीची बेटे आणि महत्वाच्या नाक्यावर नगरसेवक निधीतून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. या दिव्यांची देखभाल महापालिकेकडून योग्य प्रकारे होत नसल्याने सुमारे 90 टक्के दिवे बंद अवस्थेत आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मुद्द्यावरुन स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, महापालिका निधी देत असताना हे दिवे बंद असतात हि बाब गंभीर अाहे असे सांगत पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी हे दिवे सुरु करण्यासाठी कोणेतेही आदेश देण्याचे टाळले. यामुळे स्थायी समितीत बंद अवस्थेत असलेल्या हायमास्ट दिव्यांचा प्रश्न उपस्थित होवूनही हे दिवे चालू होणार का याचे मात्र उत्तर मिळालेले नाही.

नगर अभियंता खात्यामार्फत अभियांत्रिकी विभागात आय.बी.पी.एस संस्थेअंतर्गत सुमारे 264 रिक्ते पदे भरण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीत मांडला होता. शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी या प्रस्तावावर हरकत घेत, सरळसेवा भरतीमध्ये 540 रिक्त पदांची भरती केली. या भरतीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच मुंबईत बंद असलेल्या हायमास्ट दिव्यांकडे समितीचे लक्ष वेधले. अनेक दिव्यांची देखभाल होत नाही, बहुतांश विभागातील दिवे दिवसा चालू आणि रात्री बंद असतात. अंधेरीत गेल्या पाच वर्षापासून अनेक भागातील दिवे बंद आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर रिलायन्स कंपनीला काम दिल्याचे सांगून हात वर केले जाते. तर रिलायन्स कडून आम्ही कामच घेतले नसल्याचा दावा केला जातो आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी त्रास सहन करावा लागत आहे, असे सांगत राजूल पटेल यांनी अंधेरीतील दिव्यांबाबतच्या समस्यांचा पाढा वाचला. मुंबईत 90 टक्के दिवे बंद आहेत. प्रशासन केवळ हंगामी पदे भरण्यावर भर देत असल्याने दिव्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब गंभीर असून प्रशासनाने याप्रकरणाची दखल घ्यावी. तसेच ही सर्व पदे भरल्यानंतर नागरिकांना खरंच सोयी सुविधा मिळतील का, याचा ही खूलासा करावा अशी जोरदार मागणी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली. तसेच मुंबईतील हायमास्ट दिव्यांबाबतचा अहवाल समितीला सादर करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्षांकडे केली.

महापालिकेकडून प्रत्येक प्रभागाला एमएनटीअंतर्गत 2 कोटी रुपये दिले जातात. या निधीतून प्रभागाने आपल्या कामासह हायमास्ट दिव्यांचे बील भरणे बंधनकारक आहे. मात्र, बिले न भरल्याने हायमास्ट बंद असल्याचा खूलासा अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी केला. तसेच ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. मात्र हे दिवे कधी चालू होतील, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे हायमास्ट दिव्यांबाबत प्रशासनालाही काही घेणेदेणे नसल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad