राजकीय पक्षांच्या भांडणात मुंबई फेरीवालामुक्त -
मुंबई । प्रतिनिधी 29 Oct 2017 -
मुंबईचे रस्ते, पदपथ, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणच्या जागा फेरीवाल्यांनी व्यापलेल्या दिसतात. मात्र गेल्या काही दिवसापासून राहू ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर रस्ते पदपथ रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त झाली असली तरी याला काँग्रेसने केलेल्या विरोधानंतर मुंबईमधील राजकारण फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून पेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईत सुरु असलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा फेरीवाल्यांनी धसका घेतला आहे. राजकीय पक्षाच्या भांडणात आपल्या मालाचे व आपले नुकसान होऊ नये म्हणून फेरीवाल्यांनी आपले धंदे बंद ठेवण्यास प्राधान्य दिले असल्याने मुंबईतील रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्थानकातील परिसर तात्पुरता का होईना फेरीवाला मुक्त झाल्याचे दिसत आहे.
२९ सप्टेंबरला पश्चिम रेल्वेच्या एल्फिस्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकात संताप मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान राज ठाकरे यांनी रेल्वे आणि पालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. या पंधरा दिवसात फेरवाल्यावर कारवाई न झाल्यास सोळाव्या दिवसापासून मनसे स्टाइलने कारवाईचा ईशारा दिला होता. पंधरा दिवस संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन करत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मनसेने सुरु केलेल्या या कारवाईला विरोध करत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत संसदेने लागू केलेले फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी केली आहे. तो पर्यंत कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई करू नये शी मागणी केली आहे. यावेळी मनसे या राजकीय पक्षाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे. यानंतर मालाड येथे निरुपम यांनी बेकायदेशीरपणे सभा घेतली. या सभेत गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, तर ते कायदा हातात घेतील असा इशारा निरुपम यांनी दिला होता.
निरुपम यांच्या सभेनंतर मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला आहे. संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं आहे. मनसेने गुंडागर्दी सुरु केली आहे, त्यांनी कायदा हातात घेतल्यानेच असे प्रकार होत असल्याचं संजय निरुपम बोलले आहेत. दरम्यान निरुपम यांनी बेकायदेशीर सभा घेतल्या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसे आणि काँग्रेस एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरली असताना काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका मराठी माणसाला फेरीवाल्याने मारणे कदापि सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना”, असे म्हणत नितेश राणेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. मुंबईतील काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष होत चालला आहे. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात, पण मराठी माणूस चालत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी निरुपम यांच्यावर केली आहे.