मुंबई । प्रतिनिधी 31 Oct 2017-
मुंबईतील एल्फिस्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एल्फिस्टन स्थानकात नवा पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल लवकरात लवकर बांधता यावा म्हणून पुलाचे बांधकाम लष्कराकडून केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली. 31 जानेवारी 2018 पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत. एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवली स्थानकातील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत. 5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे.
फूटओव्हर स्थानकांवरील अरुंद ब्रिजमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांना केली होती. आपत्कालीन स्थितीत कमीत कमी कालावधीत पूल बांधण्याचे कौशल्य लष्कराकडे आहे. भारतीय सैन्यातील इंजिनीयरिंग विंग यासाठी ओळखली जाते. 2010 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोसळलेला पूल लष्कराने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केला होता. यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मुंबईत पूल उभारला जाणार आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिलं होतं. एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे यासारख्या स्टेशनवर, फूट ओव्हर ब्रिज वापरणा-या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकदाच पण कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. एल्फिन्स्टनचा पूल कमीतकमी वेळात बांधला जावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे शेलार यांनी ट्विट करुन म्हटले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसह एलफिन्स्टन पुलाची पाहणी केली. यानंतर एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.