मुंबई - स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आज सकाळी दिंडोशी व गोरेगाव येथे विविध ठिकाणी आयोजित स्वच्छता मोहिमेला शिवसेनेची मोलाची साथ मिळाली. महाराष्ट्राचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज भारतभर विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. मुंबईत देखिल या स्वच्छता मोहिमेला विविध ठिकाणी सदस्यांचा व नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन समोर आयोजित स्वच्छता मोहिमेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर, आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांनी हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी पालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष अँड. सुहास वाडकर, स्थापत्य समिती अध्यक्ष उपनगरे तुळशीराम शिंदे, पी उत्तर विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त संगीता हसनाळे, कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरक्षक उदय राजेशिर्के, शाखाप्रमुख संदीप जाधव, रायगड प्रतिष्ठानचे सस्थापक सीताराम मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात खासदार कीर्तिकर यांनी या प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वर्षे जरी दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करत असले तरी गेली अनेक वर्षे सदर प्रतिष्ठान स्वच्छता मोहिम आयोजित करत आहे.
आमदार प्रभू यांनीं देखिल प्रतिष्ठानच्या या स्वच्छता मोहिमेचे कौतूक केले.आज मुंबईभर या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली स्वच्छता मोहिम आणि याबाबाय केलेली जनजागृती निश्चितच मुंबईकरांना स्वच्छतेबाबत ऊर्जा देणारी आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतीष्ठान तर्फ पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात त्यांच्या सदस्यानी केलेल्या वृक्ष लागवडीचा आता वटवृक्ष झाला असून आज त्याठिकाणी हरणांचा मुक्त संचार होत आहे तो पर्यावरण प्रेमींना निश्चित आल्हाददायक असल्याचे गौरवोद्गार आमदार सुनिल प्रभू यांनी काढले.