मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावरील झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना घडल्यावर सर्व पादचारी आणि रेल्वेच्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. याच दरम्यान मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकात नव्याने बनवण्यात येणारा पूलही अरुंद असल्याने याठिकाणीही एल्फिस्टन रोडची पुनारावृत्ती होण्याची शक्यता प्रवाश्यांकडून वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने वेळीच जागे होत, या पुलाची उभारणी सुरु असताना गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रवाश्यानी व्यक्त केले आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकावर अनेक ठिकाणी जुने-ब्रिटीशकालीन पादचारी पूल आहेत. सध्याच्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी अश्या ठिकाणी नव्याने पादचारी व रेल्वे पुलांची आवश्यकता आहे. एल्फिन्स्टन प्रमाणेच चिंचपोकळी, करी रोड, विरार, नालासोपारा, परळ, कुर्ला तसेच अनेक रेल्वे स्थानकातील पूल अरूंद आहेत. त्यापैकीच एक करी रोड स्थानकात एकुलता एक पूल इतका अरूंद आहे की, गर्दीच्या वेळेस या पुलावरून चालायचं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारख आहे. पूल चढूनवर गेल्यावर समोर तिकीट खिडकी आहे. तिकीट खिडकीसमोरच्या अरूंद जागेत प्रवासी तिकीट काढण्यासाठी लांब रांग लावून उभे असतात, याच ठिकाणी कधी कधी तिकीट तपासनीसही प्रवाश्याना तिकीट तपासणीसाठी थांबवत असतात. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाश्यांची कोंडी होत असते.
यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून वर्षांनुवर्षे होत आहे. या मागणीनुसार रेल्वेनं पुलाची रुंदी वाढवण्याचा प्रस्ताव आणला खरा, पण ३० वर्षे झाली तरी हा प्रस्ताव कागदावरच आहे. तर दुसरीकडे प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रेल्वेनं स्थानकावर नवा पादचारी पूल बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. मात्र हा पूलही अरूंद असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. एकावेळेला दोन प्रवासी चढू शकतील आणि एक प्रवासी उतरू शकेल एवढीच या पुलाची रुंदी आहे. हा नवा पूल प्लॅटफाॅर्मवर अगदी मधोमध उतरवण्यात आला असून त्याच्या समोर अगदी दोन फुटांवर प्लॅटफाॅर्मवरील शेडचा पिलर आहे. त्यामुळे प्रवाशांना नवा पुल बांधूनही याचा काहीही उपयोग होणार नाही असे प्रावाश्यांचे म्हणणे आहे.