मुंबई । प्रतिनिधी 29 Oct 2017-
मध्य रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून आपले नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळापत्रकानुसार मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी जादा 18 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रात्री सुटणारी शेवटची कर्जत लोकल आपल्या वेळेआधी 10 मिनिटे आधी सोडण्यात येणार आहे. सीएसएमटी-कर्जत लोकल मध्यरात्री 12.30 ऐवजी मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल. यामुळे रात्रीच्या कर्जत लोकलची वेळ आणखीन कमी करण्यात आल्याने ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
मुंबईच्या मध्य रेल्वेचे वेळापत्रक बदलणार असताना फेऱ्यांची संख्या 838 वरून 856 करण्यात येणार आहे. संपूर्ण मध्य रेल्वेवरील दैनंदिन फेऱ्यांची संख्या 1688 वरून 1706 वर पोहोचली आहे. त्यात दिवा स्थानकावरील फास्ट लोकलची संख्या वाढविण्यात आलेली आहे. आतापर्यंत दिवा स्थानकात 24 फास्ट लोकल गाड्यांना थांबा देण्यात आला होता. त्यात वाढ होऊन ही संख्या 46 पर्यंत नेण्यात आली आहे. मध्य रेल्वेने जादा फेऱ्या वाढविताना कल्याण-डोंबिवलीकरांना झुकते माप दिले असून टिटवाळा-अंबरनाथवासीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. 1 नोव्हेंबरपासून वाढविण्यात येणाऱ्या 25 पैकी 17 फेऱ्या केवळ कल्याण-डोंबिवलीसाठी असून, टिटवाळा-अंबरनाथसाठी वाढीव आठ फेऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कमी अंतराच्या रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये टिटवाळा-अंबरनाथ मार्गावरील लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. या मार्गावर एकूण सात फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. टिटवाळा ते अंबरनाथ मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असताना तिथेही फेऱ्या वाढविणे आवश्यक होते. त्याप्रकारची मागणी काही वर्षांपासून सुरू असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
डाऊन मार्गावरील शेवटच्या लोकल -
सीएसएमटी-ठाणे रात्री 12.31 वा.
कुर्ला-ठाणे रात्री 12.56 वा.
ठाणे-कल्याण रात्री 1.19 वा.
कल्याण-कर्जत रात्री 1.52 वा.
अप मार्गावरील पहिली लोकल -
कसारा-आसनगाव रात्री 10.05 वा.
आसनगाव-टिटवाळा रात्री 11.08 वा.
टिटवाळा-कल्याण रात्री 11.29 वा.
बदलापूर-कल्याण रात्री 11.31 वा.
कल्याण-सीएसएमटी रात्री 11.52 वा.
या गाड्या रद्द -
कुर्ला-अंबरनाथ पहाटे 4.44 वा.
सीएसएमटी-अंबरनाथ सकाळी 7.05 वा
अंबरनाथ-सीएसएमटी रात्री 8.29 वा.
टिटवाळा-आसनगाव पहाटे 5.05 वा.
टिटवाळा-कुर्ला रात्री 11.46 वा.
आसनगाव-कल्याण रात्री 11.32 वा.
सीएसएमटी-टिटवाळा रात्री 10.20 वा.