महापालिकेच्या कार्यालयांतही ओल्या कच-यापासून खत निर्मिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2017

महापालिकेच्या कार्यालयांतही ओल्या कच-यापासून खत निर्मिती


मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या 10 कार्यालयांच्या परिसरांसह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारात महापालिकेच्याच पुढाकाराने स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत ओल्या कच-यापासून खत निर्मिती आता सुरु झाली आहे. या सर्व 11 ठिकाणी मिळून दररोज सुमारे २ हजार 400 किलो एवढ्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती होत आहे. तसेच आणखी 6 ठिकाणी एकूण 600 किलो क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात खत निर्मिती प्रकल्प उभारावयाचा झाल्यास मार्गदर्शनासाठी शहर विभागातील नागरिकांनी विनायक भट यांच्या 9004445244 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. पूर्व उपनगरातील नागरिकांनी सुनिल सरदार यांच्या 9833539023 तर पश्चिम उपनगरातील नागरिकांना पोमसिंग चव्हाण यांच्या 7045950797 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा; अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.

विलेपार्ले पश्चिम परिसरात असणा-या महापालिकेच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय सरासरी 100 किलो ओल्या कचऱ्यापासून 6 आठवड्यात गांडूळ खत तयार होते. बोरिवली पश्चिम परिसरात असणा-या महापालिकेच्या 'आर मध्य' विभाग कार्यालयाच्या परिसरात देखील कच-यापासून खत निर्मिती केली जाते. येथील प्रकल्पाची क्षमता दररोज साधारणपणे 150 किलो ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची आहे. बोरिवली पश्चिम परिसरातील महापालिकेच्या वनविहार उद्यानामध्ये 100 किलो ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 'आर दक्षिण' विभाग कार्यालयांतर्गत कांदिवली पश्चिम परिसरातील दिव्यदर्शन सोसायटीच्या आवारात असणा-या महापालिकेच्या मंडई क्षेत्रातील ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ही 50 किलो ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची आहे.

महापालिकेच्या 'पी उत्तर' व 'पी दक्षिण' विभाग कार्यालयांच्या परिसरात देखील गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता ही अनुक्रमे 100 व 150 किलो एवढी आहे. तर 'के पूर्व'विभाग कार्यालयाच्या परिसरात ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारे 2 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून यांची क्षमता ही प्रत्येकी 100 किलो एवढी आहे. विलेपार्ले परिसरातील उप मुख्य पर्यवेक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात दैनंदिन 25 किलो एवढ्या क्षमतेच्या ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती करणारा प्रकल्प सुरु झाला आहे. भायखळा पूर्व परिसरातील 'वीरमाता जिजाबाई भोसले व प्राणिसंग्रहालय' च्या परिसरात महापालिकेचा सर्वाधिक क्षमतेचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे पंधराशे किलो एवढ्या ओल्या कच-यापासून गांडूळ खत निर्मिती होत आहे. तसेच मंत्रालयाजवळील सारंग इमारतीसमोर महिला विकास संस्थेच्या आवारात देखील महापालिकेच्या पुढाकाराने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु झाला असून त्याची दैनंदिन क्षमता ही 25 किलो एवढी आहे.

Post Bottom Ad