मुंबई - कांदिवली पश्चिमेतील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालय परिसरात उंदरांचा उपद्रव वाढल्याच्या घटना घडल्याने तसेच काही रुग्णांना उंदरांच्या चाव्याच्या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. प्रशासनाने उंदीर प्रतिबंधासाठी अतिरिक्त व तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी महापालिका सभागृहात दिली.
शताब्दी रुग्णालयातल्या या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी रुग्णालयाची पाहणी करून आढावा घेतला. सभागृहात याप्रकरणी उमटलेल्या पडसादानंतर कुंदन यांनी याबाबत खुलासा केला. संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटिस पाठवल्याचे त्यांनी सांगितले. उंदिर प्रतिबंधासाठी तातडीची उपाययोजना काय करण्यात आली आहे, याबाबतही त्यांनी निवेदन केले. रुग्णालयातील पाईपांवर 'रॅट गार्ड' बसविणे, जेणेकरुन पाईपांच्या आधारे उंदीर रुग्णालयात प्रवेश करु शकणार नाहीत. उंदीर पकडण्यासाठी ग्लु-पॅड, रॅट गार्ड, रॅट ट्रॅप (पिंजरा) यासारख्या विविध साधनांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिल्याचे कुंदन यांनी सांगितले. कच-यातील अन्नपदार्थ, फेकण्यात आलेल्या खाद्य इत्यादींमुळे उंदरांना त्यांचे अन्न सहजपणे उपलब्ध होते. ज्यामुळे उंदरांच्या संख्येत वाढ होण्यास बळ मिळते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयातील स्वच्छता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने देखील सर्वंकष प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने क्लिनअप मार्शलद्वारे रुग्णालयातील स्वच्छता विषयक बाबींवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान आढळून आलेली उंदरांची बिळे तातडीने शास्त्रीय पद्धतीने बंद करण्याच्या; तसेच उंदरांची संभाव्य प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना कीटक नियंत्रण विभागाला देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या साफसफाईसाठी ९ हाऊस किंपींग यंत्रणा व ४ बहुउद्देशीय कामगार संस्था यांना अस्वच्छतेच्या संबंधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तसेच रुग्णांकडून पैसे मागणा-या १ सुरक्षा रक्षक व १ कंत्राटी कामगार यांना सेवामुक्त करण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.
तातडीच्या उपाययोजना -
-- छतामध्ये असणारी उंदरांची संभाव्य प्रवेशद्वारे अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे.
-- रुग्णालयातील खिडक्यांमधून उंदीर येण्याची संभाव्यता असते, ही बाब लक्षात घेऊन सर्व खिडक्यांना जाळ्या बसवणे.
-- तसेच सदर रुग्णालयात दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस परिपूर्ण स्वच्छता व ठेवणे; तसेच त्याबाबत नियमितपणे पर्यवेक्षण करावे
-- स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच उंदरांचा उपद्रव नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचा अवलंब करणे; उदाहरणार्थ, डिस्प्ले बोर्ड, आरोग्य चर्चा (हेल्थ टॉक), उद्घोषण इत्यादी.