मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत रस्त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आढावा बैठकीनंतर आयुक्तांच्या माध्यम सल्लागार कार्यालयाने एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे असा दावा करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, यावर्षी 1 एप्रिल 2017 ते 4 ऑक्टोबर 2017 या सहा महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीदरम्यान 1 हजार 463 खड्डे विषयक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी 1 हजार 327 तक्रारींचे अर्थांत 90.70 टक्के इतक्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. सन 2014 - 15 मध्ये महापालिकेकडे 14 हजार 455 खड्डे विषयक तक्रारी आल्या होत्या. सन 2015 - 16 मध्ये 5 हजार 316; तर सन 2016 - 17 मध्ये 4 हजार 478 खड्डे विषयी तक्रारी महापालिकेला मिळाल्या होत्या. खड्डयांच्या तक्रारींनुसार मुंबईतील खड्डे महापालिकेने बुजवले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या डांबराचा विचार करता यंदा निम्म्यापेक्षाही कमी डांबर लागल्याचा दावा महापालिकेने केला आहे. सन 2015 - 16 मध्ये 25 हजार 130 मेट्रीक टन एवढे डांबर वापरण्यात आले होते. त्यानंतर 2016 - 17 मध्ये 29 हजार 637 मेट्रीक टन एवढे डांबर वापरण्यात आले होते. पण यावर्षी आतापर्यंत 13 हजार 34 एवढे मेट्रीक टन डांबर वापरण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांच्या बैठकीत रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.