मुंबई | प्रतिनिधी 23 Oct 2017 -
मुंबई महानगरपालिकेने गृहनिर्माण संस्था व व्यावसायिक आस्थापनांना ओला व सुका कचरा वर्गिकरण करून त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सोसायटींना 15 दिवसांची मुदत प्रशासनाने दिली होती. ही मुदत संपायला अवघे तीन दिवस उरले असतानाही 4 हजार 140 सोसाय़ट्यांपैकी फक्त 621 सोसायट्यांनी लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे शक्य असतानाही प्रक्रिया न करणा-या उर्वरित सोसायट्यांचा कचरा उचलायचा नाही असा निर्णय़ पालिकेने घेतला आहे.
कचरा वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे आदेश मोठ्या गृहनिर्माण सोसायटया व व्यावसायिक आस्थापनांना पालिकेने दिला होता. याची गेल्या 2 ऑक्टोबरला मुदत संपली. आतापर्यंत फक्त 361 सोसायट्यांनीच ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया राबवली नाही अशा सोसायट्यांनी अजून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. त्यावर लेखी हमीपत्र दिल्यास तीन महिन्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला. लेखी हमीपत्रासाठी 15 दिवसांची मुदत पालिकेने दिली आहे. या मुदतीत लेखी हमी न दिल्यास अशा सोसाय़ट्यांचा कचरा उचलला जाणार नाही अशा नव्याने नोटिसा 4 हजार 140 सोसायट्यांना पालिकेने पाठवल्या आहेत. लेखीहमी पत्र देण्यासाठीची 15 दिवसाची मुदत संपायला अवघे 3 दिवस शिल्लक राहिले आहे. दरम्यान या मुदतीत 4 हजार 140 सोसायट्यांपैकी फक्त 621 सोसायट्यांनीच प्रक्रिया राबवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यासाठी लेखी हमीपत्र दिले आहे, अशी माहिती पालिकेतील संबंधित अधिका-याने दिली. कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया राबवण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर 15 दिवसांत लेखीहमी पत्र द्या, असे पालिकेने सोसायट्यांना कळवले होते. मात्र याकडे बहुतांशी सोसायट्यांनी दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे जागा नाही किंवा अजून काही अडचणी असतील अशा सोसायट्यांचा विचार करून पर्य़ाय काढला जाईल. मात्र ज्यांना शक्य आहे, अशा सोसायट्यांनी ही प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. मात्र तसे न केल्यास अशा सोसायट्यांचा कचरा न उचलण्याच्या निर्णय़ावर पालिका ठाम राहिली आहे.