मुंबई । प्रतिनिधी - भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 11 ऑक्टोंबर 2017 रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी 21 हजार 668 पुरुष व 16 हजार 437 स्त्रिया असे एकूण 38 हजार 105 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 116 मधील सात ठिकाणी 29 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित असून यामध्ये मुख्य लढत ही शिवसेना पक्षाच्या मिनाक्षी अशोक पाटील व भाजप पक्षाच्या जागृती प्रतीक पाटील यांच्यामध्ये होत आहे. मतमोजणी 12 ऑक्टोंबर रोजी ‘एस’ विभाग कार्यालयात करण्यात येणार आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा सुमारे 500 मतांनी पराभव करून काँग्रेसच्या प्रमिला पाटील विजयी झाल्या होत्या. कामगार नेते दीना बामा पाटील यांची सून प्रमिला पाटील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसमध्ये सामील झाल्या. पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ११६ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. प्रमिला पाटील यांचा मुलगा व सुनेला भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.
प्रमिला पाटील यांची सून जागृती प्रतीक यांना भाजपने उमेदवारी देऊन पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर शिवसेनेने पुन्हा एकदा मीनाक्षी पाटील यांना तर काँग्रेसने डॉ. प्रमिला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. हि पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे. तर काँग्रेसने पालिका निवडणुकीत जिंकलेला प्रभाग राखण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीत विजय मिळावा यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रभागात तळ ठोकला आहे, तर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.