मुंबई । प्रतिनिधी - दरवर्षी पालिका कर्मचा-यांना दिवाळी आधी दिला जाणारा बोनस यंदा मात्र दोन बैठका होऊनही तोडगा न निघाल्याने लटकला आहे. त्यातच मंगळवारी तोडगा काढण्यासाठी ठरलेल्या तिसऱ्या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित नसल्याने हि बैठक झालीच नाही. बुधवारी भांडुप येथे पोटनिवडणूक होत असल्याने बोनसबाबतची बैठक आता गुरुवारी होण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाही बोनसबाबत निर्णय़ होत नसल्याने पालिका कर्मचा-यांमध्ये मात्र आता संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना मागील वर्षी 14 हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा यापेक्षा जास्त बोनस मिळावा अशी कर्मचा-यांची मागणी आहे. बोनसबाबत आतापर्यंत दोनवेळा पालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या. मात्र बोनसबाबत तोडगा निघाला नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे पालिकेत आर्थिक चणचण निर्माण झाली असल्याने मोठ्या रकमेचा बोनस देता येणार नाही, असे आयुक्तांनी सोमवारच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यामुळे 14 हजारपेक्षा अधिक बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही बैठका निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी तिस-या बैठकीत तोडगा निघेल अशी अपेक्षा कर्मचा-यांना होती. मात्र मंगळवारीही ठरलेली बैठक झाली नाही. त्यामुळे अजून दोन दिवस कर्मचा-यांना बोनसच्या निर्णय़ाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.