बेस्ट बोनसचा निर्णय नाही -
मुंबई । प्रतिनिधी -मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना या वर्षीसाठी १४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पालिका प्रशासनाबरोबर सतत बैठका घेऊन पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो. प्रशासनाकडून गेल्यावर्षी पेक्षा ५०० रुपये कमी देण्याबाबतचे मत होते. मात्र गेल्यावर्षी पेक्षा ५०० रुपये अधिक मिळून देण्यास आम्ही यशश्वी ठरल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी एकूण १६० कोटी ३० लाख तरतूद केली जाणार आहे. याचा फायदा पालिकेच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
गेल्या आठवड्यापासून पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी महापौरांनी तीन वेळा गटनेत्यांची बैठक बोलवून आयुक्तांबरोबर चर्चा केली. मात्र पहिल्या दोन बैठकीत बोनसच्या रक्कमेबाबत एकमत न झाल्यामुळे तोडगा निघू शकला नव्हता. पालिका आयुक्तांनी नोटबंदी, जीएसटी मुळे पालिकेला आर्थिक फटका बसल्याचे सांगत बोनस देण्याबाबत नकारघंटा चालवली होती. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला होता. मात्र आज महापौरांनी बोनससाठी पुन्हा पालिका आयुक्तांबरोबर चर्चा करून पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देणे भाग पाडले. यावेळी सभागृह नेते यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी मोलाची भूमिका बजावली. मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबतचे पत्र त्यांचे नेते मिलिंद रानडे यांनी आपल्याकडे दिले होते. मात्र आयुक्तांबोरबर चर्चेत कंत्राटी कामगारांना त्यांच्या ठेकेदारांनी ८.३३ टक्के बोनस द्यावा ठरले. या बाबत आयुक्त स्वतः संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांना प्रमाणेच बेस्टच्या कामगारांना बोनस मिळावा असे पत्र बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी कामगार नेत्यांच्या बोनस मागणीनुसार महापौरांना दिले होते. मात्र बेस्ट उपक्रम आर्थिक तुटीत असून तो टिकवणे महत्वाचे असल्याने अधिक आर्थिक भार पेलवणे शक्य नसल्याने बेस्ट कामगारांना बोनस देता येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी त्यांना बोनस देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी कामगार संघटना समन्वय समितीचे नेते बाबा कदम, सत्यवान जावकर, महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, दिवाकर दळवी, बा.सी. साळवी, रमाकांत बने, के.पी. नाईक, सुभाष पवार, प्रकाश जाधव, रमेश जाधव उपस्थित होते.
कोणाला किती बोनस -
मुंबई महानगरपालिका कर्मचारी -- १४,५००
आरोग्य सेविका -- ४,२००
अनुदानित खाजगी शाळा -- ७,२५०
प्राथमिक शाळा शिक्षक सेवक-- ४,५००
खाजगी अनुदान प्राप्त प्राथमिक शाळा-- २,२५०