मुंबई । प्रतिनिधी 31 Oct 2017 -
मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. या महापालिकेचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प 12 हजार कोटीने कमी झाला असताना महापालिकेच्या विविध बँकांमधील ठेवींमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. विविध बँकांमध्ये महापालिकेने तब्बल 65 हजार 913 कोटी रुपये मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवले असल्याची आकडेवारी पालिकेने स्थायी समितीत सादर केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या रकमा, कर्मचाऱयांच्या पी.एफ.च्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी,आणि दरवर्षी या ठेवींवर मिळणारे हजारो कोटींचे व्याज यामाध्यमातून जमा होणारी हजारो कोटींची रक्कम मुदत ठेवींच्या स्वरूपात कमी-अधिक व्याज दराने ठेवल्या आहेत. या बँकांमधील मुदत ठेवीबाबतची माहिती काही वर्षांपूर्वीपर्यंत महापौर, गटनेते, नगरसेवक आदींना दिली जात नव्हती. मात्र या ठेवींबाबत जेव्हा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक विशेषतः राष्ट्रवादिचे माजी गटनेते धनंजय पिसाळ यांनी सातत्याने वाचा फोडायला आणि जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर प्रशासन स्थायी समितीच्या बैठकीत विविध बँकांमधील मुदत ठेवींच्या रकमांबाबत माहिती स्थायी समितीत सादर करण्यास सुरुवात करण्यात आली.
एका बाजूला पालिका अर्थसंकल्पातील तरतूद एकूण रक्कम विकास कामासाठी वापरत नसल्याचा आरोप सर्व पक्षीय नगरसेवकांकडून केले जातात, तर दुसरीकडे निधी अभावी प्रकल्प रखडतात तर तिसरीकडे पालिका प्रशासन विविध बँकांमधील हजारो कोटींच्या ठेवींमध्ये दर महिन्याला काही कोटींची वाढ करीत कोटीच्या कोटी उड्डाणे करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्याच स्थायी समितीच्या बैठकीत या मुदत ठेवींवर व्याज कमी - अधिक प्रमाणात का, काही ठराविक बँकांमध्येच या ठेवींच्या रक्कम जास्त प्रमाणात का ठेवण्यात आल्या, याबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी याबाबत उत्तर देताना ज्या बँका चांगल्या व्याजाच्या ऑफर देतात त्या बँकांमध्ये ठेवी ठेवल्या जातात असे स्पष्टीकरण दिले होते.
महापालिकेने गेल्या जून 2017 पर्यंत विविध बँकांमध्ये किमान दरसाल 5.75 ते 7 टक्के व्याज दराने तब्बल 64,482.64 कोटींच्या ठेवी किमान 12 महिने ते 15 महिने मुदतीवर ठेवल्या होत्या. मात्र जुलै 2017 मध्ये या मुदत ठेवींमध्ये 1002.11 कोटींची वाढ होऊन ही रक्कम तब्बल 65,484.31 कोटी रूपये झाली. तर ऑगस्ट 2017 पर्यंत या मुदत ठेवींच्या रकमेत तब्बल 428.56 कोटी रुपयांची वाढ झाली. म्हणजे गेल्या दोन महिन्यात या मुदत ठेवींमध्ये तब्बल 1430.67 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.