मुंबई । प्रतिनिधी 29 Oct 2017 -
मुंबईचा पुढील वीस वर्षाचा विकास आराखडा चांगल्या प्रकारे बनविल्याने मुंबई महापालिकेकडून आता पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राचा विकास आराखडा बनवून घेतला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेला "ना नफा ना तोटा" या तत्वानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका 7 कोटी 97 लाख रुपये अदा करणार आहे.
मुंबई महापालिकेने मुंबईचा सन 2014-2034 या 20 वर्षांचा सुधारित प्रारूप विकास आराखडा 27 मे 2016 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून नगर नियोजनकारांचे मनुष्यबळ व संगणकीय भौगोलिक माहितीप्रणाली यांची मदत घेण्यात आली होती. मुंबई महापालिकेने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुधारित विकास आराखडा तयार केला आहे. मुंबई महापालिकेच्या या विकास आराखडयांबाबतच्या अनुभवाचा लाभ घेऊन पिंपरी -चिंचवड शहराचा सुधारित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्तांना केली असता त्यांनी त्याची दखल घेऊन, पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना दुसऱ्यांदा सुधारित करण्यासाठी विकास आराखडा मुंबई महापालिकेने तयार करण्यासाठी सविस्तर माहिती द्यावी, त्यासाठीचा अपेक्षित खर्च देण्यात येईल, असे 19 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे.
पिंपरी -चिंचवड शहराचा विकास आराखडा सुधारित करण्याचे काम विकास नियोजन खात्यातील अभियंते, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर नियोजनकाराच्या व संगणकीय भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञाच्या मदतीने करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी येणारा खर्च 7 कोटी 97 लाख 5 हजार रुपये पिंपरी -चिंचवड महापालिकेकडून टप्प्याटप्याने वसूल करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त यांची विंनती मान्य केली आहे. त्याच बरोबर पवई येथे म्हाडाने समायोजन आरक्षणाअंतर्गत बांधून दिलेल्या महापालिका प्रशिक्षण इमारतीमध्ये राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिकांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण वर्गाद्वारे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.