मुंबई | प्रतिनिधी - एल्फिस्टन रोड स्थानकातील पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर पालिकेने फेरीवाल्यासह वृत्तपत्र विक्रेत्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने अतिक्रमण विभाग व सहाय्यक आयुक्तांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करु नये, असे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळणार आहे.
महापालिका आयुक्तांनी 1999 साली वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबतचे परिपत्रक काढले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी. तसेच विक्रेत्यांना बाकडे आणि ऊन व पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री लावण्याची परवानगी महापालिकेने द्यावी, अशी मागणी मुंबईतील वृत्तपत्रे विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. शिवाय, मुख्यमंत्र्यांनाही विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी निवेदन दिले होते. महापालिका आयुक्तांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत, सर्व सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विभागातील वरिष्ठ निरिक्षकांना विक्रेत्यांवर कारवाई करु नये, असे निर्देश परिपत्रकातून दिले आहेत.