नवी दिल्ली 22 Oct 2017 - भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ''या एक कोटी पैकी 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये 23 ऑक्टोबरला (सोमवारी) देण्यात येणार होते'', असा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाने या सर्व प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
''वरुण पटेल यांनी माझ्यासाठी भाजपासोबत एक कोटी रुपयांचे डील केले. यासाठी मला 10 लाख रुपये अॅडवान्स देण्यात आले. उर्वरित 90 लाख रुपये ते मला सोमवारी देणार होते. पण त्यांनी मला पूर्ण रिझर्व्ह बँक जरी देऊ केली तरीही ते मला विकत घेऊ शकत नाहीत'' असे नरेंद्र पटेल यांनी सांगितले. यावेळी भाजपाकडून अॅडवान्स म्हणून मिळालेली रक्कम त्यांनी पत्रकार परिषदेतही आणली. ''भाजपाकडून अॅडवान्स रक्कम यासाठी घेतली कारण सर्वांसमोर वरुण पटेल आणि भाजपाता पर्दाफाश करता यावा.'' म्हणून हि रक्कम स्वीकारली असा दावा नरेंद्र पटेल यांनी केला आहे.
दरम्यान, वरुण पटेल आणि रेशमा पटेल यांनी रविवारी सकाळी भाजपामध्ये प्रवेश केला. हे दोघंही पाटीदार आंदोलनातील नेते होते. भाजपाप्रवेश करताना दोघांनी असा आरोप केला की, हार्दिक पटेलनं काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. तर दुसरीकडे, नरेंद्र पटेल काँग्रेसच्या सांगण्यावरुन आरोप करत असल्याचे सांगत वरुण पटेल यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.