भांडुप पोट निवडणूक - महिला मतदारांचा पुढाकार - 50.64 टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2017

भांडुप पोट निवडणूक - महिला मतदारांचा पुढाकार - 50.64 टक्के मतदान


मुंबई | प्रतिनिधी - भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस पक्षाच्‍या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर आज बुधवारी (11 ऑक्‍टोंबरला) पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणूकीत महिला मतदार मोठ्या संखेने मतदानासाठी उतरल्याचे दिसल्याने महिला लोकप्रतिनिधी निवडीसाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचे चित्र मतदान केंद्रावर दिसत होते.

भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 हा महिलांसाठी राखीव असलेला प्रभाग आहे. या ठिकाणी 7 महिला उमेदवार निवडणूक लढ़वत असून मुख्‍य लढत ही शिवसेना पक्षाच्‍या मिनाक्षी अशोक पाटील व भाजप पक्षाच्‍या जागृती प्रतीक पाटील यांच्‍यामध्ये होत आहे. या प्रभागात मतदानासाठी सात ठिकाणी 29 मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. काही मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यावरही सायंकाळी 5.30 वाजता मतदार रांगेत असल्याने मतदान उशिरा पर्यंत सूरु होते. या प्रभागात 50.64 टक्के मतदान झाले होते.

या मतदान केन्द्रांपैकी बीपीईएस ऑडिटोरियम या मतदान केंद्रात मतदार मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान करत होते तर त्या प्रमाणात दत्ता सामंत शाळा आणि सेंट झेवियर्स शाळेत कमी प्रमाणात मतदान होताना दिसले. हा प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने आपल्या विभागातील महिला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या संखेने महिला मतदार रांगा लावून मतदान करताना दिसत होत्या तर पुरुष मतदारांची संख्या फारच कमी दिसत होती. मतदान करण्यासाठी तरुण तरुणीपेक्षा मध्यम आणि वयोवृद्ध मतदार जास्त संखेने होते. बीपीईएस ऑडिटोरियम या मतदान केंद्रावर चंदा गुप्ता ही महिला मतदार आपल्या दोन महिन्याच्या यश या मुलाला घेवून मतदनाचा हक्क बजावाला. आज संपन्न झालेल्या निवडणूकीची मतमोजणी 12 ऑक्‍टोंबर रोजी ‘एस’ विभाग कार्यालयात करण्‍यात येणार आहे.

50.64 टक्के मतदान - 
भांडूप प्रभाग क्रमांक 116 मधील पोट निवडणुकीसाठी 50.64 टक्के मतदान झाले. सात उमेदवार याठिकाणी रिंगणात आहेत. असे असले तरी सेना - भाजपमध्ये खरी लढत होणार आहे. याबाबतचे चित्र गुरुवारी दुपारी 12 पर्यंत स्पष्ट होणार असून सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर 11 ऑक्‍टोंबर 2017 रोजी पोट निवडणूक झाली. या निवडणूकीसाठी 50.64 टक्के मतदान झाले. सात ठिकाणी 29 मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्यात आली होती. कुठे ही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी 5.30 पर्यंत 19269 हजार जणांनी मतदान केले.

पोट निवडणुकीसाठी दिगग्ज नेत्यांची फौज रस्त्यावर -
मतदानादिवशी शिवसेना - भाजपमधील दिगग्ज नेत्यांची फौज रस्त्यावर उतरली. ही पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनी मतदार संघ पिंजून काढला. पालिकेतील आपले संख्याबळ वाढावे म्हणून सेना-भाजपने आपली सर्वच शक्ती या प्रभागात पणाला लावली होती. भाजप खासदार किरीट सोमय्या, पालिका गटनेता मनोज कोटक स्वतः राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, आमदार अशोक पाटील भांडुपच्या 116 या छोट्याशा प्रभागात उतरले होते. मतदारांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकीय नेते मतदारसंघ पिंजून काढत असल्याचा आरोप काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून सुरू होता. राज्यभरात असंख्य प्रश्न असताना महापालिकेच्या छोट्याशा प्रभागातील निवडणुकीसाठी राज्यातील नेते आणि मंत्र्यानी येणे हेच मुळी चुकीचं आहे. त्यांना समस्यांचे भान नाही, हे यावरून दिसून येते. आपण कशाला प्राधान्य द्यावे आणि कशाला नाही, यांचा या नेत्यांकडे अभाव असल्याने त्यांनी पोट निवडणुकीकडे केवळ संख्याबळ वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते. मनोज तिवारी सारखे भाजपचे नेते या ठिकाणी ठाण मांडून होते. काँग्रेसच्या काळात या गोष्टी होत नव्हत्या, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फहिम कुरेशी यांनी सांगितले.

Post Bottom Ad