मुंबई | प्रतिनिधी 30 Oct 2017 -
बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वडाळा आगारासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले होते. या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त, बेस्ट समिती अध्यक्ष, महाव्यवस्थापक यांना केलेल्या सूचनेप्रमाणे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत रोजंदारी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने गेले 25 दिवस सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली.
240 दिवस कामगारांनी काम केल्यास त्या कामगारांना सेवेत सामावून घेतले जाते मात्र बेस्ट उपक्रमात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना गेल्या 10 वर्षात कायम करण्यात आले नव्हते. शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ऊर्जा व उद्योग विभागातील कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन प्रदान करण्याचे आदेश 24 फेब्रुवारी 2015 रोजी जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी बेस्ट प्रशासनाकडून केली जात नव्हती. यामुळे रोजंदारी कामगारांना समान काम समान वेतन या तत्वानुसार वेतनही दिले जात नव्हते. रोजंदारी कामगारांवर बेस्ट उपक्रमाकडून अन्याय केला जात असल्याने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली वडाळा आगार येथे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या आंदोलनाकडे बेस्ट प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.
अखेर प्रशासन ऐकत नसल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त तसेच बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना याबाबत तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. यानुसार बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बेस्टने मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेत कामगारांना 3 हजार 400रूपयांची पगारवाढ दिली आहे. शिवाय, रोजंदारी कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत सुरू करण्याचे यामुळे मान्य केले आहे. यामुळे रोजंदारी कामगारांना नोव्हेंबर महिन्यापासून किमान वेतन म्हणून 15 हजार 309 रुपये वेतन मिळणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने गेले 25 दिवस सुरु असलेले आंदोलन मागे घेत असताना बेस्ट प्रशासनाने केलेल्या समझोत्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. बेस्ट उपक्रमाने दिलेले आश्वासन न पाळल्यास आणि त्याची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा युनियनच्यावतीने आंदोलन केले जाईल असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.