बेस्टमधील फुकट्या प्रवाशांकडून 42 लाख रुपयांची दंड वसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2017

बेस्टमधील फुकट्या प्रवाशांकडून 42 लाख रुपयांची दंड वसुली


मुंबई । अजेयकुमार जाधव 31 Oct 2017
बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असला तरी बसमधून फुकट आणि ठरलेल्या तिकीटापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अश्या प्रवाशांवर गेल्या आठ महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 48 हजार प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 42 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टची आर्थिक घडी विस्कटली असल्याने कामगारांचे पगारही वेळेवर देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेस्टकडून सतत प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत असले तरी प्रवाशांकडून मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. बेस्टकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार फुकट्या आणि तिकिटांच्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जानेवारी ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 48 हजार 538 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंड म्हणून 42 लाख 69 हजार 443 रुपये वसूल करण्यात आले आहेत.

बेस्टने केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता सन 2017 मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 25 हजार 575 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 22 लाख 37 हजार 951 रुपये दंड वसूल करण्यात आला. मे ते ऑगस्ट या चार महिन्यात 22 हजार 963 प्रवाशांना पकडण्यात आले त्यांच्याकडून 20 लाख 31 हजार 443 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यापेक्षा मे ते ऑगस्ट या चार महिन्यात फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तिकीटाची रक्कम अधिक दहा पट दंड भरण्यास नकार दिल्यास महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 460 (ह) नुसार एक महिन्याची कोठडीत पाठवणे किंवा 200 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसेच शिक्षा म्हणून कोठडी व दंड वसुली एकत्रीत केली जाऊ शकते. यामुळे प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान व मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट अथवा बसपास घेऊन प्रमाणित केलेल्या अंतरावर प्रवास करावा. असे आवाहन बेस्टतर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad