मुंबई - राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या मागणीस अनुसरुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सेवाज्येष्ठतेनुसार मानधन देण्यात येईल. तसेच पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे मार्च 2018 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून 5 टक्के मानधनवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेला संप अंगणवाडी संघटनांनी मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप मागे घेत असल्याचे यावेळी विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची आज विविध अंगणवाडी संघटनांनी भेट घेतली. त्यावेळी अंगणवाडी संघटनांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. याभेटी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आमचे सरकार नेहमीच सकारात्मक होते. त्यामुळेच मागील तीन वर्षात दोन वेळा मानधनवाढ करण्यात आली आहे. आताच्या मानधनवाढीस आपण स्वत: पुढाकार घेऊन मान्यता दिली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून यापुढील काळातही त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नुकतीच मानधनवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 311 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. आता सेवाज्येष्ठतेनुसार मानधन तत्वामुळे त्यात अजून 40 कोटी रुपयांची भर पडेल. अशी एकूण 351 कोटी रुपयांची ही मानधनवाढ असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमच्या शासनाने मागील तीन वर्षात 2 वेळा मानधनवाढ दिली आहे. सेविकांसाठी नुकतीच जाहीर केलेली 1500 रुपयांची मानधनवाढ ही त्यांच्या एकूण मानधनाच्या 30 टक्के इतकी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मानधनाच्या तत्वास मान्यता दिल्याने त्या मानधनात अजून वाढ होणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मानधन आतापासूनच म्हणजे तात्काळ प्रभावाने लागू केले जाणार आहे. याशिवाय पुढील आर्थिक वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून 5 टक्के मानधनवाढ देण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मानधनवाढ आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड यांच्यासह विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी एम. ए. पाटील, शुभा शमीम, व्ही. एस. दामले, माया परमेश्वर आदी उपस्थित होते.