शहीद पोलीसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अक्षयकुमारकडून आर्थिक मदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2017

शहीद पोलीसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अक्षयकुमारकडून आर्थिक मदत


मुंबई 21 Oct 2017 - अभिनेते अक्षयकुमार यांनी 103 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला 25 हजाराचा धनादेश व दिवाळीसाठी मिठाई दिली आहे. यापैकी 39 धनादेशांचे वितरण कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात दोन शहीद पोलीसांच्या कुटुंबियांना घरी भेट देऊन सुरुवात करण्यात आली.

कसबा बावडा येथील करवीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या दिलीप संकपाळ (वय49) यांचे कर्तव्यावर असतानाच ह्दयविकाराचा झटका येऊन निधन झाले होते. त्यांच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन अक्षयकुमार यांनी पाठविलेला धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे दिला. तसेच यावेळी त्यांच्या मुलांसाठी मिठाई दिली. यावेळी अक्षय कुमार यांनी पाठविलेले पत्रही पालकमंत्र्यांनी वाचून दाखविले. दिवंगत संकपाळ यांच्या पत्नी सुभद्रा संकपाळ, आई इंदुबाई संकपाळ, मुलगी श्वेता संकपाळयावेळी आदी उपस्थित होते.

कसबा बावडा लाईन बाजार येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय 44) यांचा कर्तव्यावर असताना अपघात झाला व त्यातच ह्दयविकाराने निधन झाले.त्यांच्याही घरी भेट देऊन पालकमंत्र्यांनी अक्षयकुमार यांच्याकडून आलेला धनादेश व मिठाई दिली आणि त्यांचे पत्रही वाचून दाखविले. यावेळी त्यांच्या पत्नी रुपाली जाधव, मुले स्नेहल व प्रतिक आणि आई हौसाबाई जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहल जाधव यांच्याशी अक्षयकुमार यांनी स्वत: दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही कुटुंबियांना यावेळी आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

“आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांचे सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल.आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा,ही माझी नम्र विनंती” अशा भावना अक्षयकुमार यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत.

Post Bottom Ad