मुंबई - रिक्षा परमिटच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी लाच मागणाऱ्या संजय बोडके या पोलिस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बोडके हे पवई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
पवई परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालकाने काही दिवसांपूर्वी रिक्षा परमिटसाठी अर्ज केला होता. त्यावेळी चालकावर पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी ते पवई पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी हे प्रमाणपत्र देण्याचे काम संजय बोडके यांच्याकडे होते. तक्रारदारांनी बोडके यांची भेट घेतली असता, प्रमाणपत्रासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी बोडके यांची तक्रार एसीबीकडे केली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना बोडके यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून एसीबी अधिकारी अधिक तपास करत आहेत.