मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 29 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या अतिवृष्टीची 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीशी तुलना केली. 26 जुलैच्या पावसानंतर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात लेप्टोचे एकूण 1 हजार 446 रुग्ण आढळून आले होते, तर 119 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. ही बाब लक्षात घेऊन यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाने 29 ऑगस्टच्या अतिवृष्टीनंतर जनजागृतीसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिम राबविली. या मोहिमेदरम्यान 90 लाख एसएमएस विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती केली गेली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे, गृहभेटी देखील आयोजित करण्यात येऊन प्रतिबंधात्मक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. या सर्व मोहिमेला नागरिकांनी अत्यंत सजगपणे सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही मोहिम प्रभावी ठरुन लेप्टो प्रसारास प्रतिबंध करणे ब-याच अंशी शक्य झाले, असे नमूद करत महापालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.
29 ऑगस्ट व 19 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान अनेक नागरिकांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या पाण्याशी संबंध आलेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते.ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपचारांबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली होती. लेप्टो प्रतिबंधाबाबतची माहिती थेटपणे नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने लघुसंदेशांचा (SMS) वापर करण्यात आला. यानुसार दि. 31ऑगस्ट रोजी 50 लाख लघुसंदेश, तर 2 सप्टेंबर रोजी 40 लाख लघुसंदेश; याप्रमाणे एकूण 90 लाख लघुसंदेश थेटपणे नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आले. या लघुसंदेंशांद्वारे नागरिकांना लेप्टो प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात येऊन सहकार्यास्तव आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर विविध प्रसारमाध्यमांनी देखील महापालिकेच्या या मोहिमेला अतिशय चांगले सहकार्य केले, ज्यामुळे सदर माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यास मोलाची मदत झाली, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले.
सदर मोहिमेदरम्यान विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे १७३ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांचा लाभ 35 हजार 774 नागरिकांनी घेतला. याव्यतिरिक्त 20 लाख 86 हजार 307 गृहभेटी देण्यासह 93 लाख 56 हजार 694 एवढ्या लोकसंख्येचे प्रतिबंधात्मक सर्वेक्षण देखील करण्यात आले. त्याचबरोबर या मोहिमेदरम्यान लेप्टो प्रतिबंधात्मक औषधोपचारांचा भाग म्हणून 4 लाख 64 हजार 854 डॉक्सीसायक्लीन या गोळ्यांचे मोफत वाटप महापालिका क्षेत्रात करण्यात आले. वर्ष 2015 मध्ये महापालिका क्षेत्रात लेप्टोचे 176 रुग्ण आढळून आले होते. यापैकी 19 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले होते.वर्ष 2016 मध्ये 267 रुग्णांपैकी 9 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले होते. तर यावर्षी सप्टेंबर 2017 पर्यंत लेप्टोचे 212 रुग्ण आढळून आले; तर 7 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यु झाले, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.