मुंबई । प्रतिनिधी -
पर्यटन विशेष पारदर्शी बोगी अशी चर्चेत असलेल्या विस्टाडोमला अखेर प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाची परवानगी मिळाल्यामुळे सोमवारी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससह विस्टाडोम मध्य रेल्वेवर धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम ही बोगी जोडण्यात येणार आहे. यामुळे कोंकणात जाणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.
पर्यटन विशेष आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी विस्टाडोमची निर्मिती करण्यात आली आहे. ही ट्रेन पावसाळी वेळापत्रकानुसार सोडण्यात येईल. दादर स्थानकाहून १८ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर याकाळात ती उपलब्ध असेल. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी (१२०५१) जनशताब्दीसह आणि मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी (१२०५२) जनशताब्दीसह धावणार आहे. देशातील रेल्वेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या एक्प्रेस गाडीला हा विशेष विस्टाडोम डबा जोडला जाणार आहे. या एअरकंडिशण्ड डब्याचे छत आणि भिंती पारदर्शक काचेच्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेरचा निसर्ग पाहता येणार आहे. डब्यामध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडीही लावण्यात आल्या आहेत. ३.३८ कोटी रुपये खर्चाच्या या ४० आसनी डब्यामध्ये ३६० डिग्रीने फिरणाऱ्या खुर्च्या आहेत. विस्टाडोम डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेत प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा आनंद मिळणार आहे.