परेवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाश्यांकडून ७ करोडच्या दंडाची वसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2017

परेवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाश्यांकडून ७ करोडच्या दंडाची वसुली


मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवर बिना तिकीट प्रवास करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाश्यांच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात अभियान चालवण्यात आले होते. या अभियानादरम्यान तिकीटापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणे, बिना तिकीट प्रवास करणे, बुकिंग न करता सामान घेऊन प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाले अश्या विविध प्रकरणात कारवाई करून तब्बल ७ कोटी रुपयांच्या दंडाची वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी याच कालावधीत ५. ३८ टक्के जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर ऑगस्ट महिन्यात १ लाख ७५ हजार प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ६ करोड ७६ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. दलाल आणि असामाजिक तत्वांविरोधात २०३ वेळा कारवाई करण्यात आली यात २३९ लोकांना पकडण्यात आले. त्यांच्यावर रेल्वेच्या विविध कलमांनुसार केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या अभियाना दरम्यान ८७९ भिकाऱ्यांवर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून २२५ व्यक्तींना कारागृहात पाठवण्यात आले आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या १२ वर्षाहून अधिक वयाच्या १९८ शालेय विद्यार्थ्यांना पकडण्यात आले असून त्यांना त्या डब्यातून पुरुषांच्या डब्ब्यात पाठवण्यात आले. पश्चिम रेल्वेवर वेळोवेळी अश्या प्रकारच्या कारवाई करण्यात येते. प्रवाश्यांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास केल्यास रेल्वेच्या महसुलात वाढ होऊन प्रवाश्याना चांगल्या सुविधा देणे शक्य आहे. यामुळे प्रवाश्याना योग्य तिकीट घेऊन सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

दरम्यान यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत महिलांच्या डब्ब्यातून पवास करणाऱ्या १० हजार ७८५ प्रवाश्यांवर कारवाई करून २५ लाख ५० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. अपंगांच्या आरक्षित डब्यांतून प्रवास केल्याप्रकरणी आठ महिन्यांत ३८ हजार १३८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ८७ लाख ७९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सुरक्षा बलाने पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांसाठी (विनातिकीट प्रवासी वगळता) १ लाख ३३ हजार २३७ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे हद्दीत व लोकल गाडय़ांत बेकायदा व्यवसाय करणाऱ्या १८ हजार ६७८ फेरीवाल्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई केली. लोकल, मेल-एक्स्प्रेसमधील आपत्कालीन साखळी विनाकारण ओढून रेल्वेचा वेळ वाया घालविणाऱ्या १ हजार १४२ प्रवाशांना पकडण्यात आले. अनधिकृतपणे तिकिट विक्री करणाऱ्या ३९१ जणांवर कारवाई करण्यात आली.

Post Bottom Ad