१ हजार ३७२ मेट्रीक टन निर्माल्य जमा
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईत यंदा ११ दिवसात तब्बल २ लाख २ हजार ३५२ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी कृत्रिमतलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन २८ हजार ७६४ इतकी आहे. गणेश विसर्जना दरम्यान एक हजार ३७२ मेट्रीक टन निर्माल्य जमा झाल्याची माहिती महापालिकेने दिली. पालिकेला सहकार्य करणाऱ्या विविध केंद्र, राज्य सरकारी आणि निम सरकारी यंत्रणा, हॅम रेडिोओ, प्रसारमाध्यमे, खासगी संस्था, एन.एस.एस., एन.सी.सी., अनिरुद्ध अॅकॅडमी, श्री श्री रविशंकर अॅकॅडमी यांनी महापालिकेला सहकार्य केले. तर निर्माल्य गोळा करण्याचे काम करुन मुंबई स्वच्छ ठेवण्याचे कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
गिरगांव, दादर, माहीम, जुहू, खारदांडा या चौपाटी आणि शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडूप आदी मुख्य गणेश विसर्जनस्थळी तसेच ३२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेची सर्व यंत्रणा मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवली होती. गतवर्षी, २०१६ मध्ये नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित केलेल्या एकूण गणेशमूर्तींची संख्या २ लाख १० हजार ११८ इतकी होती व कृत्रिम तलावांमध्ये ३० हजार ५५९ इतक्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या मूर्तींची संख्या २८ हजार ७६४ इतकी आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य कलश विविध विसर्जनस्थळी पालिकेच्या सुमारे ५ हजार ६७१ कर्मचा-यांनी १३७२ मेट्रीक टन निर्माल्य जमा केले. यासाठी टेम्पो आणि ट्रक्स यांची व्यवस्था मागणीनुसार प्रत्येक विभागात दिवस आणि रात्रपाळीत केली होती.