मुंबईत विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू तर ३४ जण किरकोळ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2017

मुंबईत विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू तर ३४ जण किरकोळ जखमी


मुंबई | प्रतिनिधी -
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष, ढोल ताशांचा गजर, लेझीम आणि झांज पथकांचा झंकार, फुलांचा वर्षाव करीत अनंत चतुदर्शीला अकरा दिवसाच्या बाप्पाला लाखो भाविकांनी निरोप दिला. लालबागच्या राजाचे तब्बल २२ तासांनी विसर्जन झाले. मुंबईत बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सार्वजनिक ७०३४, घरगुती ३३,३५०, गौरी १८८ असे एकूण ४०,५७२ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रीम तलावात सार्वजनिक १६४ घरगुती २७५८ गौरी ५ अश्या एकूण २९२७ गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकी दरम्यान, मद्यपान करुन नाचणाऱ्या एका गणेशभक्ताचा मृत्यू झाला. तर ३४ जण किरकोळ कारणामुळे जखमी झाले, अशी माहिती पालिकेने दिली.


दहा दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी गणपती बाप्पा आपल्या गावी निघाले. सकाळी अकरा वाजल्यापासूनच ढोल ताशांच्या गजरात, डिजेच्या गडगडाटात, नाचत- गुलाल उधळीत बाप्पांचा जयजयकार करीत, मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. गुरूवारी सकाळी अकरा वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. गणेशभक्तांचा आनंद शिगेला पोहचला होता. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकायाचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी लालबाग परळ परिसरात मोठा जनसमुदाय जमला होता. बाप्पाचे रूप डोळयात साठवण्यासाठी सर्वच जण रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्याने जमा झाले होते. इमारतीच्या टेरेसवर व बाल्कनीतून बाप्पावर फुलांचा वर्षाव सुरू होता. गिरगाव चौपाटीसह मुंबईच्या सहा चौपाट्यांवर घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी जनसागर उसळला होता. गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा,खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिध्द मंडळांच्या गणेशमुर्तींना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली हाती. मुंबईतील चौपाटयांवर वाजत गाजत बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणाहून निघालेल्या मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक वळवण्यात आली होती. गणेश भक्तांना विसर्जन स्थळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीत सीसी टिव्ही कॅमरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीवर जनसागर लोटला होता. महापालिका आणि पोलीस दलाने केलेल्या योग्य प्रकारच्या नियोजनामुळे गणेश भक्तांना कोणताही त्रास झाला नाही.

मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलावात केले बाप्पाचे विसर्जन -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाचे वर्षा बंगल्यावरील हौदात विसर्जन केले. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा ही देखील उपस्थित होती. सर्व गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

Post Bottom Ad