मुंबई - मुंबईचे महापौर,आयुक्त यांच्यासह अतिरिक्त आयुक्त,सभागृहनेते ,विरोधी पक्ष नेते आणि विविध समित्यांचे अध्यक्ष या व्ही.आय.पी. लोकांची पालिकेच्या खास वाहनांद्वारे ने-आण करणार्या चालकांनी आज त्यांच्या हक्काच्या ओव्हर टाईमपोटी ११ महिने थकीत मोबदल्यासाठी आज पालिका सभागृहासमोर एकजुटीने उभे राहून काही काळ ठिय्या आंदोलन केले.
आम्ही व्ही आय पी वाहन चालक म्हणून महापौर,आयुक्त यांच्यापासून ते सर्व गटनेते समिती अध्यक्ष यांना,सकाळी सहापासून ते रात्री अपरात्रीपर्यंत सुरक्षित व चांगल्या प्रवासाची सेवा देतो. आमच्या कधीकधी तर आठवड्यातून एक दिवसही आमच्या पत्नी,मुले आणि आई-वडील यांच्यासोबत सुखाचे दोन खासही आम्हाला धड खायला वेळ मिळत नाही, अशी व्यथा काही चालकांनी व्यक्त केली.
महापौर, आयुक्त, सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामाला महत्व देताना आम्ही चार - चार तास प्रमाणित वेळेपेक्षाही जास्त वेळ काम करतो. त्यामुळे आम्हाला कायद्याने ओव्हर टाईमपोटी पालिकेने हक्काचा मोबदला देणे अपेक्षितच आहे.मात्र गेल्या ११ महिन्यापासून आम्हाला आमचा जादा वेळ काम केल्याचा मोबदला देण्यात आलेला नाही.त्यामुळे आज आम्ही सर्व एकजुटीने पालिका सभा चालू असतानाच मुद्दाम सभागृहासमोर उभे राहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी उभे राहिलो होतो,असे काही चालकांनी सांगितले.
महापालिकेत आम्हा व्ही आय पी वाहन चालकांव्यतिरिक्त रुग्णवाहिका चालक यांच्यावरही अशाच प्रकारे अन्याय् झाला आहे,अशी माहिती या चालकांनी दिली. तसेच महापालिकेत जवळजवळ व्ही आय पी,रुग्णवाहिका व अन्य असे मिळून २५०० चालक असल्याचे सांगण्यात आले. आमच्या या हक्काच्या मोबदल्यासाठी आम्ही आयुक्त,अतिरिक्त आयुक्त, महापौर,स्थायी समिती अध्यक्ष,सभागृह नेते,विरोधी पक्षनेते आदिंकडे वेळोवेळी निवेदन दिले मात्र सर्वांनी केवळ आश्वासने दिली, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सभगृहाबाहेर येताच या चालकांना आपल्यासोबत नेले आणि या चालकांना सभागृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यास मज्जाव करणार्या सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला