महापालिका तानसानंतर मध्य वैतरणा धरणावर वीज निर्मिती करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2017

महापालिका तानसानंतर मध्य वैतरणा धरणावर वीज निर्मिती करणार


जल वीज प्रकल्पानंतर पवनचक्की, सौरऊर्जा प्रकल्पाची तयारी -
मुंबई । अजेयकुमार जाधव -
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने धरण क्षेत्रातील विजेची समस्या लक्षात घेत तानसा धरणावर स्वतःचा वीज निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. तानसा धरणावरील वीज प्रकल्प योग्य रित्या सुरु असल्याने ५० टक्के वीज बिल कमी करण्यात यश आल्याने आता मध्य वैतरणा धरणावरही पवनचक्की तसेच सौरऊर्जा प्रकल्प उभारणीची योजना आखली जात असल्याची माहिती पालिकेचे जल अभियंता अशोक तवाडिया यांनी दिली.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरण प्रकल्पांच्या पाहणी दौर्‍यात पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी होणार्‍या पाणीपुरवठ्याची माहिती देण्यात आली. शिवाय पालिकेच्या जल अभियंता विभागाचे प्रस्तावित प्रकल्प, नव्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तानसा धरणाला दर महिन्याला २० लाखांचे वीज बिल येते. हे वीज बिल कमी करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी पुढाकार घेऊन तानसा धरणावर ४० किलोव्हॅट वीज निर्मितीचा प्रकल्प मार्च २०१७ ला सुरु केला. या प्रकल्पामुळे धरणासाठी लागणाऱ्या एकूण विजेपैकी ५० टक्के वीज बचत करण्यात अभियंत्यांना यश आले असल्याची माहिती तवाडिया यांनी दिली.

हा वीज प्रकल्प सुरु राहण्यासाठी ४०० ते ४२१ एफआरएल लेव्हल असणे आवश्यक आहे. सध्या पाऊस समाधानकारक असल्याने डिसेंबर पर्यंत वीज निर्मिती सुरु राहणार आहे. डिसेंबर नंतर हि लेव्हल ४०० एफआरएलच्या वर राहण्यासाठी वैतरणा धरणातून आवश्यक असलेला पाणीसाठा घेऊन हावीज प्रकल्प सुरु राहणार आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सुरुवातीला ४९ लाखांचा खर्च आलं असला तरी यामुळे पालिकेचे वीज बिलासाठीची दरमहा दहा लाखांची बचत होत असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप कोर यांनी सांगितले.

मध्य वैतरणावर पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प -
तानसा धारणावर वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी सुरु झाल्यावर जल विभागाच्या अभियंत्यांनी आता वैतरणा धरणावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. वैतरणा धरणाचे दरवाजे विजेवर चालतात. या विभागात विजेची समस्या असून धरणाला ४० किलोमीटर इतक्या अंतरावरून वीज पुरवठा केला जातो. विजेची काही समस्या झाल्यास तीन चार दिवस वीज नसते. अश्यावेळी डिझेलवरील डीजी सेटचा वापर करून धरणाचे दरवाजे उघडावे व बंद करावे लागतात. वीज व डिझेलवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा व पवनचक्कीवर वीज प्रकल्प राबवून वीज निर्मिती केली जाणार आहे. तानसा प्रमाणेच या प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज बीलावर खर्च होणारे पालिकेचे दरमहा लाखो रुपये वाचणार आहेत.

आजी माजी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश -
तानसा धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करण्याची संकल्पना माजी उप प्रमुख अभियंता मालवीय यांनी मांडली होती. या संकल्पनेला त्यांचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी साथ दिली. जल अभियंता खात्याचे प्रमुख जल अभियंता अशोक तवाडीया, उपायुक्त रमेश बांबळे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर मार्च २०१७ ला हा वीज निर्मिती प्रकल्प सुरु झाला.

Post Bottom Ad