मुंबई - गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये निवडणूका होत असताना भाजपाने वापरलेले सोशल मिडियाचे अस्त्र त्यांच्यावरच उलटले आहे. गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर विरोधकांनी विकास वेडा झाला अशी मोहीम सुरू केली आहे. यामुळे भाजपाचे धाबे दणाणले असतानाच हाच धागा पकडत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता विकास वेडा झाला असल्याची टिका केली आहे. निवडणूक आल्यानंतरच तुम्हाला शिवरायांची आठवण येते, मात्र निवडून आल्या नंतर त्या शिवरायांच्या माता भगिनींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास पाठिंबा देताना भाजपावर चढवला.
अंगणवाडी सेविकांचं पगारवाढीसह इतर मागण्यासाठी सध्या मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. या अंगणवाडी सेविकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले. त्यावेळी अंगणावाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर सटकून टीका केली. ज्या मातांचे आशिर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. “मी इथे नेतृत्त्व करायाला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. तुम्ही आई बनून कुपोषित बालकांचं पालन पोषण करता. ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. अंगणवाडीसेविका ज्या दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी असेल” असे ठाकरेंनी स्पष्ट केले. “आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करु शकत नाही. मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
भाजपकडून लोकशाहीच्या माध्यमातून ठोकशाही चालली असेल तर ती आपण मोडून काढू, अंगणवाडी सेविकांची ताकद सरकारला नमवू शकते आणि इतिहासाची पुनरावृत्ती घडवायची इच्छा त्यांची असेल तर ती पुनरावृत्ती घडवण्याची आपली तयारी आहे, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. ठाकरे यांच्या उपस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू असा इशारा महाराष्ट्र अंगणवाडी कृती समिती कडून यावेळी देण्यात आला.