मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम उपनगरातील बांद्रयातील चमडावाला नाल्यामुळे विभागात अनेक ठिकाणी पाणी साचते. यामुळे लोकांनाही त्रास होतो. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी चमडावाला नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात १५ दिवस अहवाल सादर करा असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
चमडावाला नाल्याच्या रुंदीकरणाबाबत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या सह मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, सहाय्यक आयुक्त शरद उघडे इत्यादींनी भेट दिली. पाऊस पडल्यानंतर चमडावालानाला नाल्यातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जयभारत सोसायटी, रेल्वे कॉलनी, एस व्ही रोड परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचते. नाल्यात बांद्रा टर्मिनल भागात फिडर लाईन आहेत त्यामुळे पाणी वाहून जात नाही येथे पंप लावून पाण्याचा उपसा केला जातो. तसेच काही ठिकाणी नाल्यावर अतिक्रमणे आहेत. हि अतिक्रमणे त्वरित हटवावीत, नाल्याचे रुंदीकरण करावे तसेच नाल्याला समांतर असा नाला बांधण्यात यावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली. यावर १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सिंघल यांनी दिले आहेत.