मुंबई, दि. २२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन हप्त्यांमध्ये शिक्षण शुल्क रक्कम देण्यात येणार आहे. पहिला हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यार्थी केंद्रीत आहे. या योजनेमुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आणि इतर काही विभागाअंतर्गत असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी विनाअनुदानित आणि कायम विनाअुनदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
०२१७-१८ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ५०टक्के मर्यादेपर्यंतची शिक्षण शुल्काची रक्कम दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीत बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून देण्यात येणारा आधार क्रंमाक प्राप्त करुन सदर आधार क्रंमाक बँकेच्या खात्याशी संलग्न करुन घेण्यात येत आहे. Aadhaar Payment Bridge System द्वारे शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, शिष्यवृत्ती,प्रतिपूर्ती इत्यादींची रक्कम थेट लाभार्थीच्या (DBT) खात्यात पाठविता येईल अशी कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे.