मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत अनेक ठिकाणी भंगारवाल्यांची दुकाने आहेत. या दुकानांमधील काही भंगाराच्या सामानाला चांगली किंम्मत मिळत नसल्याने असे सामान दुकानाबाहेर ठेवले जाते. त्यामुळे अश्या भंगार सामानाची विल्हेवाट लावता यावी म्हणून मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत "जंक यार्ड" बनवण्यात यावे अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी दिली. हि ठरावाची सूचना येत्या महासभेपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे.
मुंबईत अनेक लोक भंगाराचा व्यावसाय करतात. भंगाराच्या खरेदी-विक्रीतून व्यावसायिकाच्या कुटुंबाचा उदारनिर्वाहही होत असतो. भंगाराचा व्यवसाय करताना घर, कारखाना, दुकाने, गॅरेज इत्यादी ठिकाणी निर्माण होणाऱ्या भंगारातून संबंधित व्यावसायिक वापरण्यायोग्य सामानाचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम करत असतात. परंतु, अशा भंगारामधील वापरण्यायोग्य नसलेले सामान हे व्यवसायिक एकत्रच फेकून देतात. त्यामुळे नाले तुंबणे, रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन परिसर अस्वच्छ होत असतो. परिणामी पर्यावरणाची हानी होते. भंगार व्यावसायिकाकडील पुनर्वापरायोग्य नसलेले सामान टाळण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये एखादी जागा (जंक यार्ड) निश्चित केल्यास सर्व भंगार व्यावसायिक नको असलेले सामान त्याठिकाणी टाकतील. त्यामुळे हे सामान जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिकेने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही असे सईदा खान यांनी म्हटले आहे.