२० सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना मालकीचे घर मिळावे या मागणीसह त्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सफाई कामगारांच्या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येत्या २० सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व दलित मित्र गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे श्राद्ध घातले जाणार आहे.
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर शासन दरबारी मुंबई महानगर पालिकेकडे अनेक निवेदने दिली, प्रशासकीय मंत्री स्तरावर अनेक बैठका घेतल्या, अनेक आंदोलने केली गेली. परंतु या प्रलंबित मागण्या अजूनही पुर्ण झालेल्या नाहीत. यामुळे या उपेक्षित दलित समाजात फार मोठ्या उद्रेकाचे वातावरण तयार झाले आहे. या उद्रेकामुळे व प्रलंबित मागण्याबाबत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांचे श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सफाई कामगार सेल, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस, सफाई कामगार मालकी घर हक्क समिती व महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती इत्यादी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर या आंदोलनाला बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटीत कामगार संघ (म. प्रदेश), भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस सफाई कामगार सेल, संभाजी ब्रिगेड, आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या संघटना, मराठा मूक मोर्चाचे मुंबई आयोजक आणि युवा प्रतिष्ठानने पाठिंबा दिला आहे.
सफाई कामगारांच्या मागण्या -
सन १९८६, १९८७, १९८८ या काळात महाराष्ट्र शासनाने ५ शासन निर्णय पारित केले. या निर्णयांची आजतागायत अंमलबजावणी केलेली नाही. लाड - पागे समिती नियमामध्ये सुधारणा करून सन १९७५ पासून मुंबई महानगर पालिकेसह शासनाच्या इतर सर्व विभागात त्वरित लागू करण्यात यावेत. मुंबई पालिकेतील सन २००९ च्या भरतीतील उर्वरित गुणवत्ता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मागील अतिरिक्त यादयाप्रमाणे त्वरित विशेष बाब म्हणून विधिग्राह्यता नियम शिथिल करून सहानुभूतीपूर्वक मनपा सेवेत सामावून घ्यावे, असंघटीत क्षेत्रातील सफाई कामगारांसाठी माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर सफाई कामगार कल्याण बोर्डाची स्थापना करावी.