मुंबई - इतर राज्यातील विधानमंडळ सदस्यांना अर्थसंकल्पीय प्रकाशने कशाप्रकारे दिली जातात, यासंबंधी त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे, याचा अभ्यास करून त्याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, अशा सूचना आज वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
विधानमंडळ सदस्यांना अर्थसंकल्पीय प्रकाशने बॅग ऐवजी संकेतस्थळ, टॅबलेट किंवा पेन ड्राईव्ह याद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. गिरीराज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व अर्थसंकल्पीय पुस्तके छापण्यासाठी एका वर्षात एकूण किती खर्च येतो याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देऊन मुनगंटीवार म्हणाले, सर्व विधानमंडळ सदस्यांना पत्र पाठवून त्यांच्या या संदर्भातील प्रतिक्रिया जाणून घेण्यात याव्यात तसेच अंदाज समितीला अर्थसंकल्पीय पुस्तकांची माहिती पाठविण्यात यावी. त्यापैकी कमी महत्वाची पुस्तके पेन ड्राईव्ह किंवा इतर माध्यमातून देता येऊ शकतील का याची शक्यता पडताळून पाहण्यात यावी. उत्तम दर्जाचे टॅबलेट किंवा पॅड देण्यासाठी किती खर्च येऊ शकेल याचा अंदाजही घेण्यात यावा, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, जर संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सर्व अर्थसंकल्पीय पुस्तके उपलब्ध करून द्यावयाची झाल्यास एक उत्तम संगणक आज्ञावली त्यासाठी विकसित करावी लागेल, माहिती तंत्रज्ञान विभागाशी यासंदर्भात चर्चा करण्यात यावी.
चव्हाण यांनी बैठकीत दिल्ली येथे अर्थसंकल्पीय प्रकाशने कशा प्रकारे उपलब्ध करून दिली जातात याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली.