मुंबई, 19 Sep 2017 : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी व त्यांनी स्वच्छतेचा अंगीकर करावा, यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर स्वच्छता दूत नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशपातळीवर 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सह्याद्री वाहिनीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोणीकर बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर स्वच्छता दूत नेमण्याबाबत शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगून लोणीकर पुढे म्हणाले, राज्यात स्वच्छतेचे उत्तम काम सुरु आहे. देशातील सर्वात जास्त हागणदारीमुक्त ग्रामपंचायती महाराष्ट्रात झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. आतापर्यत 11 जिल्हे, 163 तालुके, 26 हजार गावे, 18 हजार 500 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती करण्यासाठी18 लाख कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून दिले. जालना जिल्ह्यापासून लोटाबंदी हा उपक्रम राबविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक एक गाव दत्तक घेऊन तेथे एक दोन दिवस मुक्काम करुन स्वच्छतेविषयीची माहिती लोकांना देण्याचे काम केले. वैयक्तिक शौचालयाच्या लाभार्थी घटकांना पूर्वी रुपये 4 हजार 600 एवढे अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करुन हे अनुदान रुपये 12 हजार इतके करण्यात आले आहे. मार्च 2018 पर्यंत स्वच्छ महाराष्ट्र करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.