मुंबई, दि. १५ : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अर्जावर सुनावणी करताना देण्यात येणारी नुकसान भरपाई नागपूर येथील कुमारी ज्योती किसनजी बालपांडे यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात नुकसान भरपाई देणारे हे निवृत्त झाले आहेत. तक्रारदार बालपांडे यांना नुकसान भरपाई मिळण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता यासंदर्भातील सर्व शासन निर्णय आणि नियम तपासून घेण्याचे आदेश महिला आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी आज दिले.
ठाकूर यांनी यावेळी सांगितले, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या प्रकरणातील कार्यवाही प्राथम्याने करीत असताना यासंदर्भातील सर्व शासन निर्णय आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम तपासून घ्यावे. मंत्रालयात आज आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनामध्ये एकूण ५ प्रकरणांवर सुनावणी झाली. यामधील दोन प्रकरणासंदर्भात विभागीय स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने तेथील कार्यवाही पूर्ण झाल्यावर या प्रकरणांवर कार्यवाही करता येणे शक्य आहे. तसेच पुणे येथील हडपसर मधील अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्यात यावे अशी मागणी प्रभावती सुभाष वाघुले यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. आता हे बांधकाम पाडण्यात विभागीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.