मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिका शाळांच्या दर्जाबाबत वारंवार आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात निकृष्ठ दर्जाच्या शालेय वास्तूंसह शिक्षण पद्धतीचा परदाफाश केला. आधी टॅब आणि त्यानंतर शालेय पोषण आहार यासंदर्भात आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी एकेक विषयांची चिरफाड करत महापालिका शाळांच्या शिक्षण पद्धतीवर सवाल करत आसूड ओढले. त्यामुळे ही शिक्षण पद्धती आणि दर्जा सुधारण्यासाठी एक धोरण बनवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी तत्कालिन आयुक्तांची भेट घेऊन महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा सुधारण्याची तसेच शिक्षण प्रक्रीयेत बदल करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी महापालिका सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारेया गंभीर मुदयावर सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. सईदा खान यांनी सभागृहात या शैक्षणिक वर्षात शालेय मुलांना वाटप करण्यात आलेल्या दप्तरांसह काही वस्तूच दाखवून कशाप्रकारे तीन महिन्यांत त्या खराब झाल्या, याची माहितीच दिली. या माध्यमातूनच त्यांनी काही मुलांना वह्या, पिकनिक, चिक्की आदी मुद्यावर लक्ष वेधत काही शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. एकच शिक्षक सर्व प्रकारचे विषय शिकवत आहे. त्यामुळे शिक्षक गैरहजर राहिला तर दुसरा कोणी शिक्षक शिकवायला येत नाही. असे असेल तर शिक्षणाचा दर्जा काय सुधारणार असा सवाल करत त्यांनी ठोस धोरण बनवण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याला पाठिंबा देत शिक्षण विभागातील त्रुटींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार आवाज उठवत असल्याचे सांगितले. सईदा खान यांनीही या त्रुटींकडे लक्ष वेधत जी गंभीरता मांडली आहे, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. शाळांमध्ये गळती लागून पटसंख्या कमी होत आहे याबाबत उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशीर आहात. परंतु त्यानंतरही जर आपल्याला अपयश येत असेल तर ही त्यापेक्षा गंभीर बाब असल्याचा टोला राखी जाधव यांनी महापौरांना मारला.
यावेळी सर्व नगरसेवकांनी महापालिका शाळांमधील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुजराती माध्यमांच्या शिक्षकांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्यास पाठवले जात असल्याची बाब मांडली. काही शाळांमध्ये मुलांना बाथरुम साफ करण्यास सांगितले जाते, अनेक शाळांना संगणक दिले असले तरी त्यासाठी खोल्या नाहीत अशी तक्रार करत काही नगरसेवकांनी अनेक शाळांमध्ये गळती लागलेली तर काहींच्या दरवाजे, खिडक्या तुटलेल्या असल्याची तक्रार मांडली.
आठवीच्या मुलांना टॅब देण्यात आल्यानंतर त्याच टॅबमध्ये नववीचा अभ्यासक्रम टाकून दिला जाईल,असे सांगण्यात आले होते. परंतु यावर्षी नववीच्या मुलांना टॅब देण्यता आले नाही. उलट आठवीचे जे नवीन मुले आली आहेत, त्यांनाच आधीच्या मुलांना दिलेले टॅब दिले असून आता नववीच्या मुलांसाठी टॅब मागवले जात असल्याची बाब सपाचे रईस शेख यांनी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी भाग घेत महापालिका शाळांबाबत आणि शिक्षण कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.