मुंबई , दि. १४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर २०१७ होती. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता दिनांक २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
आजपर्यंत ९६ लाख ५९ हजार ७४० अर्जांची नोंदणी झाली असून ४९ लाख ५६ हजार ३०५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत या आधी १५ सप्टेंबर २०१७ होती. ती मुदत उद्या दिनांक १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपणार होती. अजून अनेक शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याचे बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर, या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ दि. २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.