मुंबई । प्रतिनिधी -
अंधेरी आणि मुलुंड येथील क्रीडा संकुलात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाद्वारे करण्यात आला आहे. याबाबत पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहाचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झाले. मात्र अद्यापही हे नाट्यगृहे प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. नाट्यगृहाअभावी रसिकांचा हिरमोड होतो आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित नाट्यगृह कोणत्याही संस्थाना चालविण्यास न देता स्वतः ताब्यात घेवून त्वरित खुले करावे, अशी मागणी माजी सुधार समिती अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रद्वारे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह व क्रीडा संकुलाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले. 27 कोटी रुपये नुतनीकरणावर खर्च केले आहेत. नुतनीकरण होवून दोन महिने उलटून गेले. मात्र, अद्याप हे नाट्यगृह सुरु झालेले नाही. आता दसरा, दिवाळी व इतर सण येत आहेत. त्यामुळे विभागातील जनतेला कार्यक्रमासाठी व नाटक बघण्यासाठी या नाट्यगृहाची जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु, ललित क्रिडा मंडळ व कला प्रतिष्ठान या संस्थेला हे नाट्यगृह चालविण्यासाठी घाट पालिकेने घातला आहे. संबंधित संस्थेवर गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे या संस्थेस नाट्यगृह चालवायला देण्यास मुलुंड वासियांचा ठाम विरोध आहे. हे नाट्यगृह कोणत्याही संस्थांच्या ताब्यात न देता महापालिकेने स्वतः ताब्यात घेवून, जनतेला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व नाटक बघण्यासाठी त्वरीत खुले करावे, अशी मागणी गंगाधरे यांनी केली आहे.