बदली विरोधात जकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2017

बदली विरोधात जकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेत जकात रद्द करून जीएसटी कर लागू करण्यात आला. यामुळे पालिकेच्या जकात विभागातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचार्‍यांची बदली ‘सोडत’ पद्धतीने काढल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. काही सफाई कर्मचार्‍यांची ट्रान्सफर स्मशान भूमीत करण्यात आल्याने अधिकार्‍यांची सेवाज्येष्ठता डावलण्यात आल्याचा आरोप करत जकात विभागातील २४०० कर्मचार्‍यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले.

पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या जकात विभागातील ५३१ कर्मचार्‍यांची बदली ‘सोडत’ पद्धतीने काढण्यात आली आहे. कर्मचारी-अधिकार्‍यांना या बदलीचे आदेश ई-मेलद्वारे पाठवण्यात आले. मात्र कर्मचार्‍यांनी हे आदेश स्विकारत नसल्याचा पवित्रा घेतला आहे. याला पाठिंबा देत सर्व संघटनांनी स्थापन केलेल्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व २४०० कर्मचारी नैमित्तिक सुट्टीवर गेले आहेत. कोणतेही निकष न लावता केवळ सोडत पद्धतीने या बदल्या केल्यामुळे कर्मचारी नैमित्तिक सुट्टीवर गेल्याचे समन्वय समितीचे बाबा कदम यांनी सांगितले.

जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाल्यानंतर पालिकेच्या जकात विभागातील कर्मचारी-अधिकार्‍यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचार्‍यांना पालिकेच्या निरनिराळ्या विभागात सामावून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची लेखी परीक्षा घेण्याचे प्रशासनाने ठरवले होते. मात्र यामधील अनेक कर्मचार्‍यांना निवृत्ती जवळ आली असताना बदलीसाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रशासनाच्या धोरणाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

गुरुवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक
जकात कर्मचार्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त, समन्वय समितीचे पदाधिकारी, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्या उपस्थित बैठक झाली. मात्र या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी गुरुवारी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे समन्वय समितीने जाहीर केले आहे. दरम्यान, याबाबत तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत आयुक्त, समन्वय समितीचे पदाधिकारी, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांची बैठक होणार आहे.

Post Bottom Ad