मुंबई । प्रतिनिधी -
जैविक कचरा नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असतो. अशा कच-याची विव्हेवाट सार्वजनिक ठिकाणी लावणे हा नियमानुसार गुन्हा आहे. तरीही मुंबईतील कुर्ला विभागातील गुलमोहर मार्गावर हा आरोग्यास हानिकारक असलेला जैविक (बायोमेडीकल वेस्ट) कचरा फेकला जात आहे. त्याकडे मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादाय़क माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी पालिका सभागृहात हरकतीच्या मुद्दयाद्वारे दिली. ज्यांच्याकडून हा कचरा फेकला जातो, त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही मलिक यांनी केली. जैविक कचरा अशा प्रकारे फेकणे ही गंभीर बाब असल्याने प्रशासनाने याची चौकशी करावी असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.
सध्या मुंबईतील कच-य़ाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याबाबत पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मुंबईतील रुग्णालयातला रोज जमा होणारा जैविक कचरा कुर्ला येथील लोक वस्तीच्या ठिकाणी रस्त्यावर फेकला जातो. या कच-यात टाकाऊ इंजेक्शन- सुया, शस्त्रक्रिया करून काढलेले शरीराचे अवयव, सलाईन आदी जैविक कचरा अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी फेकणे नियमबाह्य आहे. या कच-यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता आहे. कचरा खुलेआम फेकला जात असतानाही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, या गंभीर बाबीकडे असा हरकतीचा मुद्दा मांडून कप्तान मलिक यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट दिले जाते. हा कचरा एका ठराविक जागेवर टाकणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता मागील अनेक दिवसांपासून अशा प्रकारचा कचरा खुलेआम फेकला जात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल विचारत संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही मलिक यांनी केली. या कच-य़ाची विव्हेवाट लावण्यासाठी ज्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे, त्याची ही जबाबदारी आहे. पालिकेकडून अशा कंत्राटदारांना लायसन्स दिले जाते. मात्र त्याचा दुरुपयोग केला जातो आहे. अशा प्रकारे खुलेआम कचरा फेकला जात असताना प्रशासन त्याबाबत गंभीर दिसत नाही. कंत्राटदारांवर प्रशासनाचा अंकुश नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या सईदा खान यांनी केला. अशा कच-याचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा नियम आहे, मात्र हा नियमभंग केला जात असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथे सीसीटिव्ही कॅमेरे लावले असतील तर त्याद्वारे कचरा कोणी फेकला हे समोर येईल. प्रशासनाने हे शोधून काढून कारवाई करावी अशी मागणीही खान यांनी केली. अशा प्रकारचा कचरा आरोग्यास हानिकारक आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. जैविक कचरा मानखुर्द - गोवंडीमध्येही मागील काही वर्षापासून फेका जातो. या कच-यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोकादायक आहे. असे कृत्य करणा-यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सपाचे नगरसेवक रईस खान यांनी केली. मुंबईमध्ये असे प्रकार इतर ठिकाणीही होतात. यावर अंकुश ठेवण्यात आला नाही, तर रोगराई पसरण्याची भिती आहे, त्यामुळे याची त्वरीत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. दरम्यान असा प्रकार गंभीर आहे. प्रशासनाने याची शहानिशा करावी, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले व चौकशी होईपर्यंत कप्तान मलिक यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी जाहिर केले.