मुंबई - महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर २१ वरून १९ वर आला असून गेल्या तीन वर्षात सातत्याने हा दर घटता ठेवण्यासाठी आरोग्य विभाग करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम’ (एसआरएस) २०१६ च्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या अहवालानुसार केरळ, तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर देशात कमी झाल्याचे नमूद केले आहे.
या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करीत आहे त्याचे प्रतिबिंब या अहवालात उमटले आहे. मात्र अर्भक मृत्यू दर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पालघर, मेळघाट भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे अर्भक मृत्यू दरात दोन अंकांनी घट झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया दरवर्षी एसआरएस अहवाल जाहीर करीत असतो. त्यामध्ये माता व अर्भक मृत्यूची देशभरातील राज्यांची आकडेवारी जाहीर करीत असते. २०१६ चा अहवाल आज जाहीर झाला असून त्यात केरळ १०, मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडू १७ आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक (१९) आहे.
सन २०१३ मध्ये महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर २४ होता. २०१४ मध्ये २२, सन २०१५ मध्ये २१ आणि २०१६ मध्ये तो १९ वर आला आहे. यावरून राज्याच्या अर्भक मृत्यूच्या दरात सातत्याने घट दोत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत तीन अंकांनी घट झाली आहे.
संस्थात्मक बाळंतपणासाठी विशेष भर, अर्भकांचे लसीकरण, अर्भकांसाठी गृहभेटीद्वारे तपासणी व उपचार सेवा, जव्हार, मोखाडा, तलासरी, मेळघाट येथे पुनरागमन शिबीराच्या माध्मयातून स्थलांतरित झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी आणि खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने तपासणी शिबीर यासारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याने अर्भक मृत्यू दर घटता ठेवण्यात यंत्रणेला यश येत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे २० लाख बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
पालघरमधील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी पालघर, जव्हार, मोखाडा, मेळघाट भाग पिंजून काढला आहे. दर १५ दिवसांनी आरोग्यमंत्री जव्हार, मोखाडा, तलासरी येथील दुर्गम पाड्यांना भेटी देत आहेत. पुनरागमन शिबीराच्या माध्मयातून स्थलांतरीत झालेल्या बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने तपासणी शिबीर घेण्यात येत आहेत. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे गेल्या वर्षी जव्हार मोखाडा भागात बालमृत्यूची संख्या ९३ एवढी होती यावर्षी ही संख्या ३८ एवढी कमी करण्यात यश आले आहे.
नुकतेच ‘नीती’ आयोगाने आपल्या अहवालात बालमृत्यू रोखण्याकामी महाराष्ट्रात आदर्शव्रत काम होत असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर एसआरएसच्या अहवालात अर्भक मृत्यू दर दोन ने कमी झाल्याचे जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या प्रयत्नांना पुष्टी मिळाल्याचे दिसून येत आहे.