मुंबई हागणदारी मुक्त रहावी यासाठी ३६ 'गुड मॉर्निग' पथके कार्यरत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2017

मुंबई हागणदारी मुक्त रहावी यासाठी ३६ 'गुड मॉर्निग' पथके कार्यरत


मुंबई । प्रतिनिधी -
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार डिसेंबर २०१६ व जुलै २०१७ मध्ये बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र हे उघड्यावरील हागणदारी पासून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र भविष्यात उघड्यावरील हागणदारी उद्भवू नये, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता ३६ 'गुड मॉर्निग'पथकांची स्थापना करण्यात आली असून यांच्याद्वारे पहाटे ५.३० पासून हागणदारी मुक्तीसाठी प्रबोधनात्मक व दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. या पथकांचे दैनंदिन संनियंत्रण हे घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या स्तरावर; तर या विषयीचा आढावा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या स्तरावर नियमितपणे घेतला जात आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार कोणतेही क्षेत्र हागणदारी मुक्त असल्याचे घोषित होण्यासाठी तीन प्रमुख निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये नागरिकांना त्यांच्या निवासी परिसराच्या ५०० मीटरच्या परिघात सर्वत्र शौचालये उपलब्ध असणे, शौचालय असण्याची माहिती होण्याकरिता जनप्रबोधन करणे; तर शौचालय उपलब्ध असूनही व जनप्रबोधन करुन देखील शौचालयाचा वापर न करणा-यांवर दंडात्मक कारवाई करणे या अटींचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे ८० हजार आसनांची ८ हजार ४१५ शौचालये आहेत. या व्यतिरिक्त जानेवारी २०१७ पासून ४ हजार २५७ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आली आहेत. या शौचालयांचा वापर संबंधितांनी करावा, यासाठी महापालिकेद्वारे नियमितपणे जनप्रबोधन देखील करण्यात येत आहे. जेथे शौचालयांचे बांधकाम सुरु आहे अशा ठिकाणी सुमारे ८०० शौचकुपे असलेली तात्पुरती शौचालये महापालिकेद्वारे यापूर्वीच पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काही महिन्यांपूर्वीच्या त्यांच्या मुंबई दौ-या दरम्यान महापालिकेच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.

महापालिकेद्वारे शौचालयांची उपलब्धता करुन दिल्यानंतर व सातत्याने लोक प्रबोधन करुन देखील शौचालयांचा वापर न करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार जनप्रबोधन व दंडात्मक कारवाई करण्यासाठी ३६ गुड मॉर्निंग पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात ५ कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये कनिष्ठ आवेक्षक, मुकादम, क्लीनअप मार्शल, कामगार इत्यादी मनपा कर्मचारी आहेत. यानुसार ३६ पथकांमध्ये एकूण १८० कर्मचारी कार्यरत आहेत. वारंवार विनंती करुनही शौचालयाचा वापर न करणा-या व्यक्तींवर 'गुड मॉर्निग' पथकांद्वारे दंड आकारणी करण्यात येत आहे. गेल्या सुमारे १५ दिवसांत 'गुड मॉर्निग' पथकांद्वारे ५७६ व्यक्तिंकडून ५७ हजार ६०० रुपये इतका दंड उघड्यावरील हागणदारीच्या अनुषंगाने वसूल करण्यात आला आहे. नव्यानेच सुरु करण्यात आलेली महापालिकेची 'गुड मॉर्निग' पथके दररोज पहाटे ५.३० पासून आपल्या कामाला सुरुवात करित असून, ज्या भागात उघड्यावरील हागणदारी आढळून येऊ शकते, त्या परिसरातील नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी विनंती करित आहेत. या ३६ पथकांपैकी ३३ पथके ही विभाग स्तरावर कार्यरत आहेत. तर उर्वरित ३ पथके ही इतर पथकांच्या कामांचे पर्यवेक्षण करण्यासाठी शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमध्ये कार्यरत आहेत.

Post Bottom Ad