मुंबई | प्रतिनिधी -
भेंडी बाजारातील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हाडाने अशा इमारती रिकाम्या करण्यासाठी पावले उचलली आहेत. हुसैनी इमारतीच्या बाजूला असलेल्या दोन इमारतीं पाडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. आता नळ बाजारातील फातिमा मेन्शन पाडण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
दक्षिण मुंबईत सुमारे १४ हजार इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत. यातील ४० ते १०० वर्षपूर्ण झालेल्या जुन्या इमारतींचा समावेश आहे. भेंडी बाजारातील इमारत कोसळल्यानंतर खडबडून जाग आलेल्या म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रर्रचना मंडळाने अशा इमारती रिकाम्या करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. नळ बाजारातील १२ इमाम रोड वरील ११७ वर्ष जुनी असलेली फातिमा मेन्शन ही २ मजली इमारत जीर्ण झाल्याने अतिधोकादायक झाली आहे. म्हाडाने ही इमारत तात्काळ पाडण्यासाठी नुकतेच रहिवाशांना पोलिसांच्या बंदोबस्तात नोटीस बजावली आहे. इमारतीत १९ कुटुंब राहत होती. त्यापैकी ९ जणांनी घरे रिकामी केली असून अद्याप १० कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. नोटीस बाजावल्यानंतर ही रहिवाशांनी इमारत रिकामी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ही इमारत अतिधोकादायक असल्याने तात्काळ रिकामी करून पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे रहिवाशांनी इमारत रिकामी करण्यास नकार दिल्यास पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. येत्या काही दिवसात ही इमारत पाडण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे, अशी माहिती म्हाडाच्या संबंधित अभियंत्यांने दिली.