नागपूर, दि. २२ : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. राष्ट्रपतींनी यावेळी विपश्यना सेन्टरमधील बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानधारणा केली.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते.
कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे १० एकर जागेत विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ८३ फूट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे. या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फूट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. राज्य शासनाने विपश्यना केंद्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना केंद्रासाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले आहे. याकेंद्रामध्ये विपश्यना साधन शिबीर घेण्यात येणार आहे.
विपश्यना मेडिटेशनमध्ये ध्यान साधनेकरिता दोन सभागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात तळमजल्यावर चोवीस कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वर्तुळाकार धम्म सभागृह बांधण्यात आले आहे. येथे १२५ साधक एकाच वेळेस सामूहिक धम्म साधना करु शकतील. या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या निवासासाठी २४०० चौ. फूट क्षेत्रफळामध्ये स्वतंत्र आणि सामूहिक निवासव्यवस्था करण्यात आली आहे. भोजन व्यवस्थेकरिता महिला आणि पुरुषांकरिता दोन स्वतंत्र कक्ष बांधण्यात आले आहेत. सेंटरच्या सौंदर्यीकरणासाठी संपूर्ण भागात लॉन आणि बगीचा तयार करण्यात येणार आहे.